शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगावात
By सुनील पाटील | Published: August 22, 2023 03:38 PM2023-08-22T15:38:52+5:302023-08-22T15:39:30+5:30
पिंप्राळ्यातील मुख्य चौकात शिवस्मारक उभारले जात आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
जळगाव : पिंप्राळ्यात साकारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पण १० सप्टेबर रोजी होत असून त्यासाठी शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगावात येणार आहे. त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी संपर्क प्रमुख संजय सावंत जळगावात दाखल झालेले आहेत. त्यांनी शिवस्मारकाला भेट देऊन कामाची पाहणी केली. दरम्यान, याच दौऱ्यात विधानसभेचीही चाचपणी होणार आहे.
पिंप्राळ्यातील मुख्य चौकात शिवस्मारक उभारले जात आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अश्वरुढ पुतळा धुळ्याहून तयार करुन आणण्यात आला आहे. पुतळ्याची परवानगी व प्रवेश नाट्य चांगलेच चर्चेत राहिले. दोन दिवसापूर्वीच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनीही शिवस्मारकाला भेट दिली. सध्या कामाला गती देण्यात येत आहे. राजमुद्रा बसविण्यात आली असून पेव्हर ट्रॅक, विद्युत रोषणाई व सुशोभिकरण इतकेच काम बाकी आहे. आठ दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.
पाच मतदार संघात विधानसभेची चाचपणी
जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व चोपडा या पाच मतदार संघावर लक्ष केंद्रीत करुन तेथील संभाव्य उमेदवारांच्या सावंत यांच्याकडून भेटी घेतल्या जात आहेत. जळगाव शहरात महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे या तिघांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे.
मानराज पार्कवर होणार सभा
शिवस्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर मानराज पार्कच्या मैदानावर जाहिर सभा होणार आहे. जिल्हाभरातून एक लाख शिवसैनिक सभेला येतील असे नियोजन करण्यात येत आहे. या सभेतूनच आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ४ सप्टेबर रोजी शरद पवारांचीही सागर पार्कवर सभा होणार आहे.