Uddhav Thackeray : भगव्याला कलंक लावणारे हात काढून टाकायचे; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 20:45 IST2023-04-23T20:45:23+5:302023-04-23T20:45:30+5:30
निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत.

Uddhav Thackeray : भगव्याला कलंक लावणारे हात काढून टाकायचे; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरे कडाडले
जळगाव:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगावातील पाचोऱ्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका केली. ही जमलेली गर्दी, हा सगळा जल्लोष पाहिला तर शिवसेना कुणाची हे कुणालाही कळेल. पाकिस्तानला विचारा शिवसेना कुणाची, तेही सांगतील. पण, आमच्याकडे धृतराष्ट्र झालेल्या निवडणूक आयोगाला समजत नाही. निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा सगळं पाहतोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
ते पुढे म्हणाले, काही जणांना वाटतं की ते म्हणजे शिवसेना, अरे हाट...यांना जसं घोड्यावर चढवलं होतं, तसं खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या निष्ठेला, भगव्याला कलंक लावला, तो कलंक लावणारे हात आपल्याला काढून टाकायचे आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणतात, आपलं सरकार होतं, त्यावेळेस कोरोनाचं जागतिक संकट होतं. आमच्या वेळेसही नैसर्गिक संकटं आली. मी प्रत्येक सभेत विचारतो, आमच्या काळात तुम्हाला मदत मिळत होती की नव्हती? पण, हे उलट्या पायाचे सरकार आल्यापासून मदत बंद झाली. आम्ही बोलायचे नाही, तर काय करायचो. आजकाल सरकारविरोधात किंवा खरं बोलणाऱ्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला जातो, असंही उद्द ठाकरे म्हणाले.