वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
By विलास बारी | Published: May 8, 2024 12:37 AM2024-05-08T00:37:36+5:302024-05-08T00:38:30+5:30
देवेंद्र फडणवीसांनी मोदी सरकारच्या केलेल्या स्तुतीवरून ठाकरेंचा पलटवार
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: भाजपच्या नेत्यांकडून केवळ विकासाच्या नावावर फसवणूक करण्याची कामं सुरू केली आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे आहेत. मात्र, मोदींच्या त्या इंजिनच्या डब्यांना भ्रष्टाचाराची चाके आहेत. कारण, सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचे सांगत, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
मंगळवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शहरातील शिवतीर्थ मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पराभव दिसत असल्याने, राम आठवत आहे. मात्र, ‘मनी नाही भाव व देवा मला पाव’ अशी स्थिती भाजपची झाली असल्याचे ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- आम्ही गुजरातचे विरोधक नाही, मात्र आमच्या हक्काचे जर गुजरातला दिले जात असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही.
- जिथे महिलांवर अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते, अशा भाजपला ‘भारत माता की जय’ म्हणण्याचा अधिकार नाही.
- मोदी हरले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील, असा कांगावा केला जातोय; मात्र मोदी जिंकले तरच पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील, कारण शरीफ यांच्या वाढदिवसाला मोदी त्यांचा केक खायला गेले होते.
- खतांवर केंद्र सरकार १८ टक्के जीएसटी घेते आणि शेतकरी सन्मानाच्या नावावर शेतकऱ्यांना केवळ सहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा सन्मान नसून, हा अपमान आहे.