भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, "असा माणूस..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 04:35 PM2023-09-10T16:35:31+5:302023-09-10T16:37:00+5:30
तीन वाक्यात तब्बल पाच वेळा केला 'टरबुज्या' शब्दाचा उल्लेख
Uddhav Thackeray vs BJP : भाजपा विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा लढा महाराष्ट्रात आता हळूहळू अधिकच तीव्र होताना दिसतो आहे. सुरूवातीला शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट यांच्या पाठिंब्याने भाजपा युतीचे सरकार राज्यात अधिक मजबूत होत आहे. अशातच जालना येथे मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचा दावा करत, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळल्याचे चिन्ह आहे. तशातच आज जळगाव मध्ये उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी एकदा नव्हे तर तब्बल ४-५ वेळा टरबुज्या असा शब्द उच्चारला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना G20 परिषदेसाठी दिल्लीला जायला वेळ आहे, पण जालना मध्ये जरांगे यांच्याशी संवाद साधायला वेळ नाही. त्यांच्या मागण्या काय इतकं तरी त्यांनी विचारायला हवे. पण तसे घडले नाही. पोलिसांनी खरं खरं सांगावं की आपल्या मनात आलं म्हणून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात तुम्ही तुमचा ताफा घुसवू शकता का? एखाद्या आंदोलनकर्त्यांच्या समुदायावर स्वत:च्या मनाने लाठीचार्ज करू शकता का? हवेत गोळीबार किंवा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडू शकता का? मला स्पष्टपणे असं वाटतं की जसा काही वर्षांपूर्वी जालियनवाला बाग हत्यांकांड झालं होतं, तसा हा कोणी तरी 'जालनावाला कांड' करू पाहतंय.... सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे"
तब्बल ५ वेळा उच्चारला टरबुज्या शब्द
ठाकरेंच्या त्या वाक्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमधून जोरजोरात ओरडाआरडा ऐकू आला. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा बोलू लागले. ते पुढे म्हणाले,"आता ऐका, मला हा माणूस माहिती नाही, तुम्ही जे टरबुज्या नाव घेताय असा माणूस मी पाहिलेला नाही. टरबुज्या म्हणालात ना... टरबुज्या... काय म्हणालात टरबुज्या... म्हणजे ते असं मोठं टरबूज असतं ते? मी, असा माणूस पाहिलेला नाही, पण तुम्ही टरबुज्या म्हणालात ना... ठीक आहे, आता मी टरबुजा सारखा (दिसणारा) माणूस बघतो. टरबूज कोण आहे ते पण मी बघेन, पण तुम्हाला माहितीये, मला नंतर सांगा."
दरम्यान, भाजपा पक्ष संपवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केला. "देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा संपवला. नाथाभाऊला संपवलं. सफाचट केलं. सर्व उपरे घेतले. आयाराम घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या उरावर बसवले. सर्व आयाराम आहेत. अयोध्येत राम मंदिर बनवलं जात आहे, तसंच आयाराम मंदिर बनवणार आहेत. हे आयाराम लोकं आहेत," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.