'कलंक'वरून जळगावात रणकंदन; प्रतिमेला काळं फासण्याचे प्रकार

By Ajay.patil | Published: July 12, 2023 04:26 PM2023-07-12T16:26:39+5:302023-07-12T16:27:02+5:30

भाजपने उद्धव ठाकरेंच्या, तर ठाकरे गटाने फडणवीसांच्या प्रतिमेला फासले काळे

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis Kalank remark Jalgaon Protest | 'कलंक'वरून जळगावात रणकंदन; प्रतिमेला काळं फासण्याचे प्रकार

'कलंक'वरून जळगावात रणकंदन; प्रतिमेला काळं फासण्याचे प्रकार

googlenewsNext

अजय पाटील, जळगाव: नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल केलेल्या ‘कलंक’ विधानावरून राज्याचे राजकारण सध्या तापले आहे. या विधानाचे पडसाद बुधवारी जळगाव शहरात उमटले. फडणवीसांबद्दल केलेल्या या विधानाबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तर ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, नितेश राणे यांच्या प्रतिमेला काळे फासत आंदोलन केले.

दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी हे आंदोलन करत, एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या दोन्ही आंदोलनामुळे काही काळ टॉवर चौक व महापालिका परिसरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा ताब्यात घेतल्या. दुपारी १२ वाजता टॉवर चौकात भाजपकडून तर १ वाजता महापालिकेसमोर शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.

पोलिसांसमोरच भाजपने ठाकरेंच्या प्रतिमेला काळे फासले
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बळीराम पेठ भागातील भाजप कार्यालयापासून मोर्चा टॉवर चौकात आणला. याठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत निषेध करण्यात आला. त्यानंतर ठाकरे यांच्या प्रतिमेला भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ठाकरे यांच्या प्रतिमेला शाही फासत आपले आंदोलन पुर्ण केले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. मात्र, त्यांच्यासमोरच भाजपने आंदोलन केले. यावेळी महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, दीप्ती चिरमाडे , महेश चौधरी यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीसांसह, बावनकुळे, राणेंवर ठाकरे गटाचा रोष
भाजपच्या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. या आंदोलनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमेला काळे फासत, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह ठाकरे गटाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरेंबद्दल ज्या प्रकारे नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले, त्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.

Web Title: Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis Kalank remark Jalgaon Protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.