उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे फक्त दिखावा अन् नौटंकी; गिरीश महाजन यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:29 AM2023-07-10T11:29:44+5:302023-07-10T11:30:07+5:30

उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज दूसरा आणि शेवटचा दिवस आहे.

Uddhav Thackeray's Vidarbha tour is just a show and gimmick; Criticism by Girish Mahajan | उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे फक्त दिखावा अन् नौटंकी; गिरीश महाजन यांची टीका

उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे फक्त दिखावा अन् नौटंकी; गिरीश महाजन यांची टीका

googlenewsNext

मला इथले लोक भेटायला आले होते. त्यांना मी म्हटले पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहे. जाहीर सभा नाही तर कार्यकर्त्यांशी बोलायचे आहे. आज गर्दी पाहून निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊदे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे. या राजकारण्यांमधील गद्दारी जाऊदे ही प्रार्थना केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आज दूसरा आणि शेवटचा दिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन भाजपाने निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कधीही विदर्भ दौरा केला नाही व कोणत्याही प्रकारची मदत विदर्भाच्या लोकांना केली नाही. मात्र, त्यांना काय कळवळा आला की, ते विदर्भ दौरा करत आहेत. हे फक्त नौटंकी असून देखावा आहे, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्रीची कधी पायरी उतरले नाही, तुम्ही कधी मंत्रालयात गेला नाहीत आणि आता तुम्ही सत्ता गेल्यानंतर विदर्भाचा दौरा करत आहात, असा निशाणा गिरीश महाजन यांनी साधला.

भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित शाह भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर नरेंद्र मोदीजी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'हे सध्या गद्दारांचं, लाचारांचं सरकार आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्राची ओळख गद्दारांचा महाराष्ट्र होऊन देणार नाही.' तसेच आता राष्ट्रवादी चोरायची काय गरज होती असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.

Web Title: Uddhav Thackeray's Vidarbha tour is just a show and gimmick; Criticism by Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.