'उद्धवजी, लंडनमधील ‘मालमत्ताकांड’ काढायला लावू नका'; एकनाथ शिंदेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 07:08 PM2023-09-12T19:08:43+5:302023-09-12T19:09:14+5:30
'उगाचच ‘पाटणकर’ काढा घेण्याची वेळ आणू नका...'
कुंदन पाटील
जळगाव : ‘जी-२०’ परिषदेच्यानिमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भेटले. भारतीय माणूस म्हणून त्यांना भेटल्याचा आनंद वाटला. या भेटीत त्यांनी ब्रिटनला या म्हणून सांगितले. दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परतात. त्याची तुम्हाला सविस्तर माहिती देतो, असेही सुनक यांनी सांगितले. त्यामुळे आमच्या भेटीवर टीका करणाऱ्यांनी जास्त बोलायला लावू नका. अन्यथा ‘पाटणकर काढा’ घेण्याची वेळ येईल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पाचोऱ्यात केला. नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा पद्धतशीरपणे हिशेब घेतला.
पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या राज्यातील पहिल्या तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी सुनक-एकनाथ शिंदे भेटीवर टीका केली होती. सुनक यांच्याशी शिंदे काय बोलले असतील, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मंगळवारी पाचोऱ्यात शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेवर भाष्य केले. ‘पाटणकर काढा’ घेण्याची वेळ येऊ देऊ नका, हा इशारा देणाऱ्या शिंदेंनी ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. वर्षभरात महायुतीच्या शासनाने विकासाचा धडाका लावला आहे. त्यामुळे काही जणांना ‘पोटदुखी’चा आजार जडला आहे. त्यामुळे लवकरच ‘डॉक्टर, आपल्या दारी’ कार्यक्रम राबविला जाणार असल्याची खोचक टीका शिंदे यांनी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अनिल पाटील यांच्यासह भाजप, सेनेचे आमदार यावेळी उपस्थित होते.
मराठा आरक्षण देताना कुणालाही धक्का लागणार नाही- अजित पवार
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्यातील लाठीमारप्रकरणी यापूर्वीच डीवायएसपीसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेकजण नौटंकी करतात. नाटकी चेहरा करतात. भावनेला हात घालतात आणि गैरसमज पसरवितात. त्यामुळे मराठा आरक्षण देताना अन्य कुठल्याही घटकाला समाजाच्या हक्काला धक्का लागू देणार नाही, असा शब्द पवार यांनी यावेळी दिला.
फडणवीसांसाठी सरसावले!
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती. या व्यंगात्मक टीकेवर एकनाथ शिंदे, अजित पवार, गिरीश महाजन यांनी भाष्य करीत उगाचच वाभाडे काढायला लावू नका, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.