उज्ज्वला गॅस योजनेचा राज्यातील १७.५ लाख कुटुंबांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:40 PM2018-02-16T16:40:54+5:302018-02-16T16:46:08+5:30
जळगाव जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा समावेश
विलास बारी /आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१६ : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ कुटुंबाना लाभ देण्यात आला. राज्यातील १७ लाख ५५ हजार ६५८ लाभार्थ्यांच्या तुलनेत जळगाव जिल्हा या योजनेत अग्रेसर ठरला आहे.
काय आहे उज्ज्वला गॅस योजना?
केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देण्याचा केंद्र्र शासनाने संकल्प केला आहे. महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाकासाठी लाकडी सरपण वापरल्यामुळे लहान बालक व महिलांना होणाºया श्वसनाच्या तक्रारी दूर करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचा लाभ कसा मिळविणार
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने एलपीजी वितरण केंद्रावर अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अर्जासोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक आहे. सोबतच पंचायत अधिकारी, नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. दारिद्रय रेषेखालील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
९९ हजार ६०३ गरीब कुटुंबाना लाभ
या योजनेंतर्गत लाभ मिळावा यासाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केलेल्या बीपीएल यादीतील एक लाख ६ हजार २८१ कुटुंबांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. त्यापैकी ९९ हजार ६०३ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
कर्ज व विनाकर्ज मिळतो लाभ
या योजनेत लाभार्थ्याला गॅस शेगडी, गॅसची रक्कम तसेच स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरावी लागते. मात्र काही कुटुंबांची ही रक्कम भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे शासन अशा ग्राहकांना शेगडीचे ९९० व गॅससाठी ७०० अशा १६९० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अशावेळी १०० रुपयात कनेक्शन दिले जाते. मात्र या कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत लाभार्थ्याला सबसिडीचा लाभ मिळत नाही.
राज्यात साडे सतरा लाख कुटुंबाना लाभ
पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा राज्यातील १७ लाख ५५ हजार ६५८ कुटुंबांना लाभ मिळाला आहे. त्यातुलनेत जळगाव जिल्ह्यात ९९ हजार ६०३ लाभार्थी असल्याने जळगाव जिल्ह्याचे काम या योजनेत आघाडीवर आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यातील बीपीएलधारकांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत एक लाख ६ हजार २८१ लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी ९९ हजार ६०३ कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
-नीलेश लठ्ठे, नोडल अधिकारी, उज्ज्वला योजना