उन्मेश पाटील यांच्या विजयाने त्यांच्या मूळगावी साजरी झाली दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:08 PM2019-05-23T16:08:33+5:302019-05-23T16:08:53+5:30
दरेगावच्या 'लेका'ने आता भूषवावे केंद्रीयमंत्रीपद !
चाळीसगाव : २०१४ पर्यंत सार्वजनिक जीवनातील कोणतीही निवडणूक न लढविणाऱ्या आमदार उन्मेष पाटील यांनी विधानसभेतील विजयाचा गुलाल उधाळला. आमदारकीच्या कारकिर्दीला सहा महिन्याचा अवधी असतांनाच त्यांनी आमदार ते खासदार ही परिक्रमा देखील पूर्ण केली. उन्मेष पाटील यांच्या याच राजकीय भरारीचा त्यांच्या दरेगाव येथील मूळ गावच्या गावकऱ्यांना मोठा अभिमान वाटतो. दरेगावच्या सुपूत्राने आता केंद्रीय मंत्रीपद भूषवावे, अशी आनंदी प्रतिक्रिया गावकºयांनी व्यक्त केली. गुरुवारी लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि उन्मेष पाटील यांच्या विजयाने गावात आनंदाचे उधाण आले.गावात दिवाळीच साजरी झाली.
दरेगावात बुधवारी सायंकाळ पासूनच उन्मेष पाटील यांच्या विजयाची चर्चा रंगली होती. मताधिक्य किती मिळणार याचेही अंदाज बांधले जात होते. केव्हा एकदा मतमोजणी सुरु होते आणि उन्मेष पाटील यांच्या विजयाची घोषणा होते, अशी मोठी उत्सुकता गावकºयांमध्ये व्यापून राहिली होती. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत चर्चा होत राहिल्या.
गुरुवारची सकाळ गावकºयांसाठी जणू उत्सुकतेची मंगल सनई वाजवूनच उजाडली. गावातील काही तरुण आणि सरपंचही मतमोजणीसाठी जळगावी गेले होते.
पहिल्या फेरी पासूनच उन्मेष पाटील यांनी प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांच्यावर आघाडी घेतल्याची वार्ता गावात पोहचताच गावकºयांनी जल्लोष केला. रणरणत्या उन्हातही गावतील मुख्य चौकात एकत्र येऊन फटाके फोडले.
आमदार ते खासदार
एरंडोल - येवला राज्यमार्गावरील चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ३५ कि.मी. अंतरावरील दरेगाव हे उन्मेष पाटील यांचे मूळ गाव. ४०० उंबºयांच्या गावात दोन हजारहून अधिक लोकसंख्या असून दहा सदस्यीय ग्रामपंचाय आहे. उन्मेष पाटील यांनी एरंडोल - येवला राज्यमार्गाचे काम केल्याने ७० गावांशी दरेगावचे दळवळण सुरु झाले असून याचे दरेगाव ग्रामस्थांना मोठे कौतुक आहे. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांचा २२ हजार मताने पराभव करीत विधानसभेचा मार्ग सुकर केला होता. जिल्ह्याच्या राजकीय सारीपाटावर ‘जायंट किलर’ अशी ओळख अधोरेखित करणाºया पाटील यांनी वयाच्या ४१ व्या वर्षी मोठ्या लीडने खासदारकीचा गुलाल उधळला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील ‘पाचवा खासदार’
लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच दिल्लीच्या संसद पटलावर चाळीसगावची मुद्रा अभ्यासू म्हणून उमटली आहे. स्व. हरिभाऊ पाटस्कर हे पहिले खासदार. त्यांनी पंडित नेहरु यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय कायदामंत्री असे महत्त्वाचे खाते सांभाळले होते.
जनता पक्षाच्या सरकारात केंद्रीय राज्यमंत्री भूषविणारे कै. सोनूसिंह पाटील, राज्यात पुलोद आघाडीचा यशस्वी प्रयोग करणारे खासदार कै. उत्तमराव पाटील, सलग चार वेळा खासदार झालेले माजी केंद्रीय राज्यमंत्री एम.के.पाटील हे सर्व चाळीसगावचे सुपुत्र. उन्मेष पाटील यांच्या रुपाने चाळीसगावला पाचवा खासदार मिळाल्याचे अप्रुपही दरेगावकरांच्या चेहºयावरुन ओंसाडून वाहत होते.
अन् खणखणू लागले मोबाईल
होमपीच असणाºया चाळीसगाव तालुक्यात उन्मेष पाटील यांनी स्वत: प्रचार केला नाही. लोकसभेच्या निवडणूक काळात फक्त ते मतदानाच्या दिवशी दरेगाव येथे सहपरिवार मतदानासाठी आले होते. तेव्हा त्यांनी अनेकांशी आपुलकीने संवाद साधल्याच्या आठवणी गावकºयांनी गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ उलगडल्या. मतमोजणीचे कल स्पष्ट होत असतांना दरेगावातही सकाळी नऊ नंतर मोबाईल खणखणू लागले. उन्मेष पाटील आघाडीवर आहेत. असे समजताच गावातील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला. एकमेकांच्या अंगावर गुलाल टाकून गावकरी एकमेकांना अलिंगन देत होते. महिलांनी दारापुढे रांगोळी साकारुन आनंदोत्सवात रंग भरले.
आमच्या दरेगावचे सुपुत्र उन्मेष पाटील खासदार झाल्याने आमच्यासाठी ही दसरा - दिवाळीच आहे. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी भरीव काम केले आहे. उच्च शिक्षित व त्यांचा अभ्यास चांगला असल्याने त्यांना मंत्रीपद दिले जावे, अशी आमची अपेक्षा आहे. सर्वसामान्य कुटूंबातील उन्मेष पाटील दिल्लीची संसदही गाजविल्याशिवाय राहणार नाही. असा आम्हा गावकºयांना ठाम विश्वास आहे.
- गिरीष पाटील,उपसरपंच, दरेगाव ता. चाळीसगाव.