सभेत न झालेले ठराव मंजुरीचा घाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:15 PM2020-01-24T12:15:36+5:302020-01-24T12:15:41+5:30
जळगाव : डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत न झालेले विविध आर्थिक विषयांचे ठराव सभेला अंधारात ठेवून परस्पर ...
जळगाव : डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत न झालेले विविध आर्थिक विषयांचे ठराव सभेला अंधारात ठेवून परस्पर मंजूर करण्यात येत असल्याचा घाट सत्ताधाऱ्यांकडून सुरू होता व त्यावर आक्षेप घेत तो हाणून पाडल्याचा दावा विरोधकांनी केला आहे़ याबाबत शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील व नानाभाऊ महाजन यांनी डेप्युटी सीईओ़ के़ बी़ रणदिवे यांच्याकडे हा आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे़
४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली़ या सभेत ३४ ठराव करण्यात आले होते़ सर्व सभेचे चित्रिकरणही करण्यात आले होते़ अशा स्थितीत निविदांना मंजुरी, प्रशासकीय मान्यता, कामांना मुदतवाढीचा विषय अशा आर्थिक विषयाशी संबधित काही ठराव परस्पर फाईल न फिरविता, सीईओंची स्वाक्षरी न घेता, मर्जीतल्या लोकांना फायदा व्हावा म्हणून या सभेच्या ठरावामध्ये घुसविण्याचा सत्ताधारी प्रयत्न करीत होते़ असा आक्षेप शिवसेना सदस्यांनी डेप्युटी सीईओ रणदिवे यांच्याकडे आक्षेप नोंदविला. आश्वासन दिल्यानंतर लेखी तक्रार न दिल्याचे महाजन यांनी सांगितले़
सौलर दिव्यांच्या त्या विषयाला स्थगितीच
निधी खर्चाची मुदत सप्टेंबरमध्ये संपल्याने सोलर दिवे बसविण्याच्या कामांचा निधी खर्च करण्याची मुदत सप्टेंबर महिन्यात संपली असतानाही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार होत्या मात्र, निधीच मिळणार नसल्याने कामे कशी होतील, असा प्रश्न नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित करून याबाबत पत्र दिले होते़ त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती़ मात्र, निधी खर्च करण्याची मुदतवाढ ही ३१ मार्च असल्याचा ठरावही न होता तो घुसविण्याचा प्रयत्न झाला मात्र, यावरही आक्षेप झाल्यानंतर ही स्थगिती कायम ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे़