ऑटोनगरातील २० वर्षांपासूनची अनधिकृत दुकाने अवघ्या अर्ध्या तासातच जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:38+5:302021-07-20T04:12:38+5:30
दबाव, फोनाफाेनीला झुगारून कारवाई झालीच : मनपाने घेतली जागा ताब्यात ; २० वर्षांपासून बळकाविली होती जागा लोकमत न्यूज नेटवर्क ...
दबाव, फोनाफाेनीला झुगारून कारवाई झालीच : मनपाने घेतली जागा ताब्यात ; २० वर्षांपासून बळकाविली होती जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ऑटोनगरातील २० वर्षांपासूनचे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासातच जमीनदोस्त केले आहे. सोमवारी पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून याठिकाणी कारवाई करण्यात आली. अनधिकृतपणे याठिकाणी दुकाने थाटून वाहने स्क्रॅप करण्याचा व्यवसाय सुरू होता. मनपाने अवघ्या अर्धातासातच दुकाने तोडून ही जागा ताब्यात घेतली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत अजिंठा चौक ते कालिका माता चौक दरम्यानच्या रस्त्यालगत गेल्या २० वर्षांपासून काही व्यावसायिकांनी अनधिकृतपणे मनपाच्या जागेवर वाहने स्क्रॅप करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच अनेक वर्षांमध्ये हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच जात होते. यामुळे महामार्गावरील वाहतुकीलादेखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होता. गेल्या आठवड्यात मनपा प्रशासनाने येथील दुकानदारांना आपले साहित्य काढून दुकाने तोडण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दुकानदारांनी दुकानांमधील साहित्य काढून घेतले होते. मात्र, दुकाने कायम ठेवली होती.
दुकानदारांचा विरोध, मनपा कारवाईवर ठाम
मनपाचे पथक पोहोचल्यानंतर याठिकाणी दुकानदारांनी व इतरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच मनपाच्या पथकाला सुरुवातीला कारवाई करू देण्यास विरोध केला. त्यामुळे मनपाचे पथकदेखील याठिकाणी येऊन काही काळ थांबलेच होते. त्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मनपाच्या पथकाला थेट कारवाई करण्याचा सूचना दिल्या. दुकानदार व काही जणांनी मनपा उपायुक्तांकडेही जाऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, उपायुक्तांनी ही जागा मनपाची असल्याने अनधिकृत बांधकामावर कारवाई केलीच जाईल, असे सांगत मनपा कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर मनपाकडूनही कारवाई सुरू करण्यात आली.
पुढाऱ्यांचे दबावतंत्र झुगारले, मनपा कर्मचाऱ्यांचेही फोन झाले स्विच ऑफ
मनपाची कारवाई सुरू झाल्यानंतर याठिकाणच्या व्यावसायिकांनी कारवाई थांबविण्यासाठी शहरातील अनेक पुढाऱ्यांकडे विनवण्या केल्या. पुढाऱ्यांनीही कारवाई थांबविण्यासाठी मोठ्या पुढाऱ्यांना फोन केले. मात्र, उपायुक्तांनी सर्व प्रकारचा दबाव झुगारत कारवाई सुरूच ठेवली. अवघ्या अर्ध्या तासातच मनपाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सर्वच दुकाने जमीनदोस्त केली. दरम्यान, उपायुक्त लक्ष देत नसल्याने अनेक पुढाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचेदेखील फोन स्विच ऑफ करण्यात आल्याने अनधिकृत बांधकामावर मनपाची कारवाई थांबविण्यासाठीचे पुढाऱ्यांचे प्रयत्न अपूर्ण ठरले.
मनपाने घेतला ताबा, भिंत उभारून करणार सुरक्षित
सर्व अतिक्रमण काढल्यानंतर मनपा प्रशासनाने या जागेवर ताबा घेतला असून, बांधकाम विभागाला तत्काळ या जागेलगत संरक्षण भिंत तयार करून ही जागा सुरक्षित करण्याचा सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच याठिकाणी भविष्यात अतिक्रमण होणार नाही याचीही दक्षता घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कारवाईदरम्यान पोलिसांचादेखील तगडा बंदोबस्त होता. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे ही कारवाई शांततेत पार पडली.