कवितेमुळे झाली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:23 AM2018-06-25T01:23:32+5:302018-06-25T01:23:39+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक प्रा.वा.ना. आंधळे यांनी कवितेला आपली माताच संबोधले आहे. वेगळेपण मांडणारा विशेष लेख.

undefined | कवितेमुळे झाली ओळख

कवितेमुळे झाली ओळख

Next



माझा जन्म तसा दोनदा झाला आणि हे मी माझे भाग्य मानतो. पहिल्यांदा आईच्या उदरी जन्मलो आणि ऐन तारुण्यात... कवितेच्या पोटी जन्माला आलो. आईमुळे या सुंदर जगाचं दर्शन झालं, तर कवितेमुळे जगात माझी ओळख झाली. बरेच प्रतिभावंत कवितेला वा साहित्यकृतीला अपत्य संबोधतात. पण माझ्या दृष्टीनं ती आईच.
आई म्हणजे संस्काराची अखंड वाट. आभाळमायेचा उत्तुंग स्त्रोत. संगोपनाच्या दाही दिशा ही सारी संपदा आईइतकीच कवितेनं मला भरभरून दिली. मी पाळण्यात असताना पासून तर वर्तमानपत्रापर्यंत तिनं माझी काळजीच वाहिलीय. अशा या कवितारुपी आईविषयी कृतज्ञता नोंदविली जावी हा अंतरीचा अट्टाहास म्हणूनच हा लेखनप्रपंच.
अंतरमनाची उकल म्हणजे कविता ही काव्याख्या मला जवळची वाटते. कविता या वाङ्मय प्रकारानं साऱ्या चराचराला व मानवी जगण्याला मोल आलं. खरं पाहिलं तर माझ्या बालपणीच जन्मदात्या आईनं माझ्या कानामनात कविता पोहचवली तर जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीवीपर्यंत गुरुजींनी कवितेच्या गायनाने लळा लावीत पार भिजवून टाकलं आणि हाच काळ माझ्या लेखन-भविष्याला आकार देणारा ठरला. कवीश्रेष्ठ भा.रा. तांबे, राजकवी यशवंत, शांताबाई शेळके, बालकवी कुसुमाग्रज, गणेश कुडे, आ.ज्ञा.पुराणिक यांच्या सृजनानं न्हालो ओथंबून निघालो.
सृजनांच्या निस्सीम सहवासाचा परिपाक महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावरच आडवा आला अन् अंतरीच्या धाव्यांना वाट लागली. मनासह कविता कागदावर मनसोक्त नाचली आणि याचवेळी माझा पुनर्जन्म झाला. प्रारंभी मित्रांमध्ये, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, महाविद्यालयाच्या नियतकालिकामध्ये माझं सृजन रांगू लागलं. माझ्या या रांगण्याचं कौतुक खान्देशातील तत्कालीन साहित्यिक कै.स.सो. सुतार, कै.नारायण शिरसाळे, कै.नीळकंठ महाजन, प्राचार्य व्ही.के. भदाणे आणि माझे आई-बाबा यांनी इतकं केलं की, कविता माझ्या जगण्याचा भाग झाली. याचवेळी जळगाव आकाशवाणी केंद्राच्या युवावाणीतील ‘नवी क्षितिजे’ या सदरानं दमदार, काव्यपीठाचा आनंद पुन्हा पुन्हा दिला.
कवी संमेलनं, साहित्य संमेलनं यातून थोरा-मोठ्यांच्या भेटी, काव्य चर्चा यामधून आपण काय लिहितो आणि काय लिहावं या जाणिवा अधिक दृढ होऊ लागल्या. त्यामुळे अनुष्टुभ, किर्लोस्कर, लोकप्रभा, शब्दालय, अस्मितादर्श, उगवाई, अक्षर वैदर्भी, मनोहर, किशोर, लोकमत दिवाळी अंक यासारख्या निखळ वाङ्मयीन अंकामधून माझा पुढचा लेखन काळ गडद झाला. ‘आपली कविता वाचली, खूपच छान’, ‘गझल खूपच बढीया’ अशी अभिप्रायाची पत्रं येऊ लागलीत. तो लेखन प्रकाशन काळ १९८४ ते ९४ होता. या काळानं मला भरभरून पे्रेरणा दिल्या आणि पॅपिलान प्रकाशन पुणे यांनी माझा पहिला वहिला ‘फर्मान’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. माझ्या या संग्रहाचं कौतुक डॉ.श्रीपाल सबनीस, प्राचार्य केशव मेश्राम, डॉ.जगन्नाथ कोत्तापल्ले यांनी समीक्षा लेखनातून मनस्वी केलं. या घटनेनं मी आनंदे चिंब न्हालो. साडेतीन दशकाच्या माझ्या या काव्यसाधनेनं ‘बालभारती’ (इयत्ता तिसरी), ‘युवक भारती’ (इयत्ता अकरावी), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (एम.ए. द्वितीय वर्ष), या पाठ्यक्रमात येण्याची भाग्यसंधी मला भरभरून दिली. याच काळात दिल्ली व मुंबई दूरदर्शनवरील मराठी-हिंदी मालिकांसाठी शीर्षक गीतलेखनही झालं.

संपूर्ण महाराष्ट्रसह-देशासह जगाच्या नकाशावर मला घेऊन जाणाºया ‘आई! मला जन्म घेऊ दे!’ या लेक वाचवा अभियान कवितेने तर इंग्रजी भाषेसह ४५ भारतीय प्रमाण व बोली भाषेत जाण्याचा मान मिळविला. आईच्या आशीर्वादात केवढं बळ असतं याची अनुभूती मनस्वी अनुभवली. कवितेला मी आई म्हटलं तुम्हीच सांगा मित्रहो! माझं काही चुकलं का?

-प्रा.वा.ना. आंधळे

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.