झुरखेड्याचे सुनील चौधरी झाले केंद्रीय अर्थमंत्रालयात उपसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 07:31 PM2020-06-14T19:31:33+5:302020-06-14T19:31:39+5:30
आहे शेतकरीपुत्र : जि. प. शाळेत घेतलेय शिक्षण
धरणगाव : तालुक्यातील झुरखेडा येथील शेतकरीपूत्र सुनील भागवत चौधरी यांची केंद्रीय अर्थमंत्रालयात उपसचिव पदी नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेवून केंद्रीय अर्थ मंत्रालयात उपसचिव पदी नियुक्त झालेल्या ग्रामीण भागातील या युवकाच्या माध्यमातून तालुक्याचा सन्मान वाढला आहे.
झुरखेडा ता.धरणगाव येथील प्रगतीशील शेतकरी भागवत छन्नू चौधरी व कोकीळाबाई यांचे पुत्र सुनील भागवत चौधरी यांची शैक्षणिक वाटचाल एका लहान खेडेगावातून झाली. त्याचे प्राथमिक -माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण जळगाव येथे झाले. त्यांनी सन २००८ साली युपीएससीची उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची नियुक्ती नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल म्हणून नुकतीच १ जून रोजी सुनिल चौधरी यांना उप सचिव,आर्थिक कार्य विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे.
गावाशी बांधीलकी कायम
सुनील चौधरी यांनी दिल्ली येथे राहूनही गावाशी आपली बांधीलकी कायम ठेवलेली आहे. गावाच्या सामाजिक कार्यातही त्यांचे मार्गदर्शन व मदत मिळत असते, असे त्यांचे मित्र सुरेश पाटील यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील युवकांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश हमखास मिळते. आई-वडिलांच्या आशीवार्दाने मी या पदापर्यंत पोहचल्याचे सुनील चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.