गॅस डीलरशिपच्या नावाखाली साडेदहा लाखाला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:21 AM2021-08-22T04:21:32+5:302021-08-22T04:21:32+5:30
यावल : बनावट कागदपत्रे तयार करून उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशिप देण्याच्या नावाखाली कालिदास विलास सूर्यवंशी (वय ३३, रा. दहिगाव, ...
यावल : बनावट कागदपत्रे तयार करून उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशिप देण्याच्या नावाखाली कालिदास विलास सूर्यवंशी (वय ३३, रा. दहिगाव, ता. यावल) या तरुणाला १० लाख ३३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सुनीलकुमार सहानी ब्रह्मदेव ऊर्फ अनिलकुमार (वय ३८, रा. तेजपूर, बिहार) व कन्हैय्या कुमार सहानी राजेंदर सहानी (वय ४३, कोलकाता) या दोघांना सायबर पोलिसांनी पंजाबमधून अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत आशितोष कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने कालिदास सूर्यवंशी यांना उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशिप देतो असे सांगून खोटी कागदपत्रे तयार केली व ती एका वेबसाइटवर पाठवून वेगवेगळ्या कारणांसाठी ए. यू. स्मॉल फायनान्स लि. या बँकेच्या यूपीआय आयडीद्वारे बारकोड स्कॅन करून वेळोवेळी १० लाख ३३ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले होते.
या व्यवहारानंतर ना डीलरशिप मिळाली ना पैसे. सूर्यवंशी यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती.