अंडरग्राऊंड केबलमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या मिटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:12+5:302021-05-31T04:14:12+5:30
जळगाव : दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत शिवाजी नगर उड्डाणपुलावरील विद्युत खांब हटविण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, महावितरणतर्फे या ...
जळगाव : दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत शिवाजी नगर उड्डाणपुलावरील विद्युत खांब हटविण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, महावितरणतर्फे या ठिकाणी अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे नियोजन सुरू आहे. या केबलमुळे वारा-वादळ यामध्येही वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कायमची मिटणार असून, वीज खांब व तारांचा खर्चही काही प्रमाणात वाचणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून लागणाऱ्या निधीवरून शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या कामाला अधिकच विलंब झाला आहे. अखेर मनपाच्या शिल्लक निधीतून पालकमंत्र्यांनी दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर महावितरणतर्फे लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मात्र, पुढील भवितव्याचा विचार करता या ठिकाणी विद्युत खांब टाकून नवीन लाईन न उभारता अंडरग्राऊंड केबल टाकण्यात येणार आहे. टॉवर चौकापासून ते शिवाजीनगरमधील पुलाच्या अंतरापर्यंत ही केबल टाकण्यात येणार आहे. परिसरातील ग्राहकांना विजेचे कनेक्शन देण्यासाठी ठिकठिकाणी फिडर उभारले जाणार आहेत. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत महावितरणचे अधिकारीही केबल टाकण्याबाबत पाहणी करणार आहेत. या केबल टाकण्यासाठी साधारणतः तीन ते चार फुटांपर्यंत चरी खोदावी लागणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.