कर्जाच्या माहितीशिवाय कर्जमाफीचा अजब अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:46 AM2017-08-05T00:46:07+5:302017-08-05T00:52:45+5:30
ना मुद्दल, ना व्याज : कोणत्या आधारावर मिळणार लाभ!
लोकमत न्यूज नेटवर्क
बभळाज : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची ‘आपलं सरकार’ सेवा केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. मात्र या अर्जात शेतकºयाकडे किती कर्ज आहे, याची माहिती नमूद करण्यासाठी ‘आॅप्शन’च नसल्याने गोंधळ उडाला आहे. गुरुवार आणि आधीच्या काही दिवसात हे चित्र दिसून आले.
आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी गेलेल्या कर्जदार शेतकरी व त्याची पत्नी यांच्या नावे आय.डी. व पासवर्ड तयार केला जातो. नंतर त्याचे नाव, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, कर्ज खात्याचा क्रमांक, बचत खात्याचा क्रमांक, कर्ज घेतले त्या संस्थेचे व बॅँकेचे नाव इत्यादी माहितीसह तो कोणत्या लाभास पात्र आहे, त्या पर्यायावर बरोबरची खूण करून दिलेले प्रतिज्ञापत्र अशी माहिती मोबाइल क्रमांकासह भरायची आहे. पण त्यात नेमके मुद्दल व व्याज किती याची माहिती विचारलेली नाही. सॉफ्टवेअरमध्ये त्यासाठी ‘आॅप्शन’च नाही! त्यामुळे सरकार कोणत्या आधारावर हा लाभ देणार, ज्या लाभासाठी माहिती संकलित केली जात आहे, त्या कर्ज रकमेचाच उल्लेख होत नसल्याने अर्ज भरण्याचा हा ‘द्राविडी प्राणायम’ कशासाठी असा प्रश्न आहे.
आॅनलाइन पद्धतीने माहिती संकलित केल्यानंतर शेतकºयाला किती लाभ होईल व सरकारने किती लाभ द्यायचा आहे, यांचा कोणत्याही प्रकारे बोध तर होत नाहीच; परंतु गोंधळात भर मात्र पडत आहे. कर्जदाराची पत्नी शेतकरी नसेल किंवा कर्जदार नसेल तरी तिचीही वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. यात सरकारचा हेतू काय आहे, ते कळत नाही.
त्यासाठी शेतकºयांची होणारी ससेहोलपट, खर्च, गर्दीतला मनस्ताप, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, त्यामुळे शेतीकामात होणारा खोळंबा, त्यामुळे होणारे नुकसान यांची भरपाई सरकार कशा पद्धतीने करणार आहे? शेतकºयाला कर्ज व व्याजाची रक्कम न समजल्यामुळे तो कोणत्या प्रकारच्या लाभास पात्र होईल, याचा उलगडा त्यास होत नाही. आणि हे सर्व करून लाभ केव्हा मिळेल, हेही निश्चित नसल्याने शेतकरी मनातून साशंक आहे़