जळगावात रेल्वे फलाटाखाली पाय टाकून बसल्याने अनोळखी वृद्ध जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:41 PM2018-04-11T12:41:48+5:302018-04-11T12:41:48+5:30
रेल्वेच्या धक्क्याने दोन्ही पाय फॅक्चर
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ११ - रेल्वे स्थानकावर फलाटाखाली पाय टाकून बसलेल्या वृद्धाचे पाय भरधाव रेल्वेच्या धक्क्याने रक्तबंबाळ होऊन फॅक्चर झाले. या अनोळखी वृद्धास रेल्वे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात हलविले असून तेथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास फलाट क्रमांक दोन वर घडली.
संध्याकाळी एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी वृद्ध जळगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन वर फलाटाखाली पाय टाकून बसला होता. त्यावेळी भुसावळकडून रेल्वे गाडी येत असताना त्याला स्थानकावरील प्रवाशांनी ओरडून उठण्यासाठी आवाजही दिले. तरीदेखील तो तेथून हलला नाही. त्यामुळे रेल्वेचा जोरदार फटका बसून दोन्ही पाय रक्तबंबाळ झाले. या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पो.कॉ. मनोज मेश्राम यांनी या अनोखळी जखमीस जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन सुतार यांनी या वृद्धाचे दोन्ही पाय फॅक्चर असल्याचे सांगितले.
दरम्यान, हा अनोळखी शिवाजीनगरातील रहिवासी असावा, असा अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तविला. असह्य वेदनांमुळे हा वृद्ध जिल्हा रुग्णालयात विव्हळत होता.