युनियन बँकेच्या शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी निम्न तापी प्रकल्पाच्या चालकासह दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 05:43 PM2021-06-22T17:43:59+5:302021-06-22T17:44:41+5:30
मानसिक छळ केल्याचा आरोप, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, दोन्ही आरोपी फरार
Next
href='https://www.lokmat.com/topics/amalner/'>अमळनेर : युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर येथील तरुणासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सागर एकनाथ पाटील या युनियन बँकेतील शिपायाने ५ जून रोजी त्याच्या राहत्या घरी पंख्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीस नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सागर याने त्याचे वडील एकनाथ पंढरीनाथ पाटील याना मी नायगाव येथे येत आहे असा फोन केला होता. मात्र सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास तो बँकेत आला नाही म्हणून मॅनेजर शुक्ला यांनी चौकशी केल्यावर सागरने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी भेट दिल्यावर त्यांना सागरने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिल्याचे आढळून आले. त्यात त्याने स्वप्नील विलास शिंदे उर्फ सैंदाने रा.अमळनेर व संतोष साहेबराव पोरजे रा. त्र्यंबकेश्वर नाशिक हल्ली मुक्काम निम्न तापी प्रकल्प हे दोघे मानसिक छळ करीत असून त्यांच्याजवळ एमएच ०८ अशी गाडी असल्याचे म्हटले होते. स्वप्नील पाटबंधारे खात्यात आहे तो गाडी चालवतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा. माझ्या घरच्यांचा काही एक संबंध नाही. त्यांना सोडू नका, असेही चिठ्ठीत लिहिले होते. सागरच्या आत्महत्येनंतर त्याची मोटरसायकल स्वामी समर्थ मंदिराजवळ बेवारस स्थितीत आढळून आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून ती पोलिसांनी जप्त केली होती. व ती सागरची असल्याचे निदर्शनास आले होते. एकनाथ पाटील घरी गेल्यानन्तर त्यांनी पत्नी व इतर मुलांशी चर्चा केल्यानन्तर सागर नेहमी यांच्याबद्दल सांगायचा असे कळले. त्यावरून एकनाथ पाटील यांनी २२ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून स्वप्नील शिंदे व संतोष पोरजे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत. दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत.