उद्धव ठाकरेंनी कमावलेली प्रतिष्ठा गमावली; महाविकास आघाडीचा देशात मोठा अपमान- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 09:17 AM2022-06-13T09:17:09+5:302022-06-13T09:39:47+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
जळगाव- संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपानं विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी या जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीचे दोन तसेच भाजपाचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. या सहाव्या जागेवर अत्यंत चुरशीची लढत झाली. यामध्ये महाडिकांनी बाजी मारली.
महाविकास आघाडीचा पराभव केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यसभेच्या एका जागेवर झालेल्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावं आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच लोकशाहीमध्ये एका मताला हे फार मोठं महत्व असतं. एका मताने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकारचा देखील पराभव झाला होता, असं रामदास आठवले म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवामुळं महाविकास आघाडी सरकारची मोठी नामुष्की झाली आहे. उद्धव ठाकरेंनी फार मोठी प्रतिष्ठा कमावली होती. परंतु या निवडणुकीमुळे त्यांची प्रतिष्ठा त्यांनी गमावले आहे. महाविकास आघाडीचा पूर्ण देशांमध्ये मोठा अपमान झाला आहे, अशी प्रतिक्रिया रामदास यावेळी दिली. रामदास आठवले रविवारी मुक्ताईनगर येथे प्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रतापसिंग बोदडे यांच्या अभिवादन सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री अपक्षांना भेटत नाहीत- देवेंद्र भुयार
मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि राहीन. आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही, असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. तसेच आम्हाला मुख्यंमत्री भेटत नाही हे खरेच आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, अपक्ष आमदारांची २० तारखेआधी भेट घ्या. त्यांची समजूत काढा. तसे मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे. आम्ही जनतेची कामे सांगतो, वैयक्तिक कामासाठी निधी मागत नाही, असेही भुयार यांनी म्हटले.