मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत चाळीसगावला नागरिकांचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:43 PM2019-11-18T22:43:29+5:302019-11-18T22:43:41+5:30
मूलभूत सुविधांचा अभाव: प्रशासकीय कामांचे नियोजन कोलमडले
चाळीसगाव : नगरपालिकेत गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून मुख्याधिकारी नसून दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. त्यामुळे सजग नागरीक संघाच्या वतीने गांधीगिरीच्या मार्गाने नगरपरिषद कार्यालयात जाऊन सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला प्रतिकात्मक हार घालण्यात आला.
शहरात आरोग्य, स्वच्छता, मूलभूत गरजा यांचा प्रश्न भेडसावत आहे. पालिकेत मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामांचे नियोजन कोलमडले असून नियंत्रण राहिलेले दिसून येत नाही. सजग नागरिक संघाच्या वतीने यापूर्वी समस्यांचे निवेदन दिलेले होते. यातील काही समस्या मार्गी लागल्या तर काही समस्या जैसे थे त्याच स्थितीत आहे.
नागरीकांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अनेक प्रशासकीय योजना खोंळबल्या आहेत. यासाठी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपाध्यक्षा आशाबाई चव्हाण, गटनेते संजय पाटील, विरोधी गटनेते राजीव देशमुख यांनी तातडीने जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करुन चाळीसगाव नगरपरिषदेस मुख्याधिकारी मिळवावा, अशी मागणी यावेळी सजग नागरीक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी गणेश पवार, दिलीप घोरपडे, उदय पवार, मुराद पटेल, स्वप्नील कोतकर, तमाल देशमुख, एकनाथ सोमवंशी, कुणाल कुमावत, खुशाल पाटील, सागर नागणे, दिपक पाटील, दिलीप सोनार, हरेश जैन, गणेश पाटील, अक्षय देशमुख, श्रीकांत भामरे आदी उपस्थित होते.