यावल तालुक्यातील साकळी येथे विहीर पुनर्भरणाचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 04:37 PM2019-07-28T16:37:26+5:302019-07-28T16:38:33+5:30
गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.
सुधीर चौधरी
चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील पिपºया कॉलनी भागातील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.
साकळी येथील पिपºया कॉलनी परिसरात एक विहीर असून, ही विहीर सध्या कोरडीठाक पडली आहे. या कॉलनीच्या जागेवर अनेक वर्षा अगोदर शेत-शिवार होते. परंतु या ठिकाणी प्लॉट पडून नागरिकांचा रहिवास वाढला. तसेच ही कोरडी विहीरही दुर्लक्षित बनली होती. तथापि, भूगर्भातील खोलवर गेलेली जलपातळी लक्षात घेऊन पावसाचे वाया जाणारे पाणी सदर कोरड्या विहिरीत उतरविण्याकरता सर्व रहिवाशांनी ठरवले. तसेच या भागातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांनी विहीर पुनर्भरण उपक्रमासाठी पुढाकार घेतला. या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने मोठमोठे डबके होतात. त्यामुळे नागरिकांना वापरण्यासाठी त्रासही होतो. तेव्हा काही रहिवाशांच्या सहकार्यातून रस्त्यावरचे पावसाचे पाणी उताराकडच्या भागात उतरवून एका चारीच्या मागार्ने विहिरीच्या भागाकडे वळविले आणि विहिरीच्या भागास पाईप लावून संपूर्ण रस्त्यावरचे पाणी विहिरीत उतरवण्यात आले. हा उपक्रम जेव्हा यशस्वी झाला तेव्हा या नागरिकांना खूप आनंद झाला. या उपक्रमातून परिसरातील पावसाचे वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरवले जाणार आहे. या उपक्रमाकरिता देवीदास माळी, शिवाजी सोनवणे, नबाब तडवी कमाल मिस्त्री, भाया पावरा या रहिवाशांचे सहकार्य लाभले.
शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय फक्त लोकसहभागातून 'पाणी आडवा- पाणी जिरवा' हा उपक्रम आम्ही राबवू शकतो, असे या रहिवाशांनी विहीर पुनर्भरणाच्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांसह रहिवाशांचे कौतुक होत आहे.