साहित्यिकाचे अनोखे मृत्युपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:37 PM2020-07-18T22:37:52+5:302020-07-18T22:38:00+5:30
संपत्ती व जबाबदाऱ्यांची वाटणी नाही, तर अंत्यसंस्काराबद्दल होत्या सूचना : त्यांच्या इच्छेनुसारच कुटुंबीयांनी दिला अखेरचा निरोेप
पारोळा: तालुक्यातील टेहू येथील जेष्ठ साहित्यिक हिंमत पुंजू मोरे यांचे १७ रोजी रात्री ११.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र मरण हे अंतिम सत्य आहे. ते कुणालाच टळलेले नाही याचे भान राखून त्यांनी आधीच आपले मृत्युपत्र करून ठेवले होते आणि त्यात आपल्यावर नेमके कशारितीने अंत्यसंस्कार व्हावेत हे नमूद करून ठेवलेले होते. त्यानुसार अधिक शोक न करता व कोणतेही विधी न करता त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
साधारणत: मृत्युपत्रात संपत्तीची वाटणी आणि आपल्या पश्चात परिवाराच्या जबाबदाऱ्यांची विभागणी केलेली असते परंतु मोरे यांचे मृत्यूपत्रसुद्धा काहीसे वेगळेच होते.
१९ आॅगस्ट २०१२ रोजीच्या या मृत्युपत्रात त्यांनी संपत्तीची वाटणी केलेली नाही. तर मृत्युनंतर आपले अंत्यसंस्कार कसा करावे हे लिहून ठेवले आहे. त्यात बाहेरगावच्या नातेवाइकांना धावपळ करीत अंत्ययात्रेला बोलावू नये. मी १०० टक्के नास्तिक आहे. माझ्या मृत्युनंतर पोथी वगैरे वाचू नये व दानपुण्य करू नये. कोणीही शोक करू नये, जास्त रडू नये. उसंतीने पत्रे पाठवून मृत्यूची वार्ता कळवावी किंवा वर्तमानपत्रातून निधन वार्ता कळवावी.
मी नेहेमी जे कपडे वापरतो तेच मृतदेहासाठी घ्यावे. नवे आणले तरी चालतील. देहाची पूजा व आरत्या करू नये. देह तिरडीवरून ठेवून वा बैलगाडीने किंवा वाहनातून माझ्या शेतात अग्निस्वाधीन करावा. निंबाच्या झाडाखाली सोयीस्कर जागा आहे. देह नेताना बाकोडी (मुरमुरे, कवडी, पैसे) फेकू नये. जीव दगड काढू नये. तिसºया दिवशी राख जमा करावी व शेतात फेकावी, उर्वरित अस्थी शेतात जमिनीत टाकावीत.
कोणतीही पूजा करू नये. नैवेद्य दाखवू नये.
पाऊस असल्यास देह गावातील स्मशानभूमीत दहन करावा. सुतक पाळू नये. १० वे , ११ वे , १३ वे , गंधमुक्ती असे विधी करू नये. माझे पितर घालू नये. वर्षीश्राद्ध डेरे भरू नये. त्या त्या दिवशी फक्त सूर्याला अगरबत्ती ओवाळावी. घरात माझा फोटो टांगू नये, असे या मृत्युपत्रात त्यांनी लिहून ठेवले होते.
मुलगा जितेंद्र याने वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी. यासाठी त्यांचे अंत्यसंस्कार मृत्युपत्राप्रमाणे केले. व त्यांचे मृत्युपत्र अंत्यसंस्कारवेळी उपस्थित लोकांना वाटप केले.
त्यांच्या निधनाने एक जेष्ठ साहित्यिक हरपल्याच्या भावना माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांनी व्यक्त केल्या.