वैश्विक अध्यात्मिक विद्यापीठामुळे सर्व संत एकत्र येणार - डॉ. शंकर अभ्यंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 01:01 PM2020-02-18T13:01:22+5:302020-02-18T13:01:32+5:30
लोणावळ्याजवळ ३१ एकर जागेवर होत आहे निर्मिती, आदित्य प्रतिष्ठानच्यावतीने विविध समाजपयोगी उपक्रमास सुरुवात
चुडामण बोरसे
जळगाव : असे एकही मोठे व्यासपीेठ नाही, जेथे सगळे संत एकत्र आहेत. आता आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिल्यांदाच वैश्विक संत विद्यापीठाची निर्मिती लोणावळ्याजवळ ३१ एकर जागेत करण्यात येत असून यामुळे देशाला अध्यात्मिक वाटचालीमध्ये अग्रभागी नेऊन ठेवणारे हे विद्यापीठ असेल, असे विद्या वाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
जनता बँकेच्यावतीने आयोजित प्रवचनानिमित्त ते जळगावात आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने डॉ. अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न : आपण अध्यात्माकडे कसे वळलात?
उत्तर : माझा अंतरात्मा सांगत होता. समाजात वाईटाची रेघ ही मोठी आहे. त्यामुळे हा बदल करून चांगली रेघ ही मोठी असावी आणि ती अध्यात्माच्या माध्यमातूनच केली जाऊ शकते. म्हणून अध्यात्माकडे वळलो. आदित्य प्रतिष्ठानची निर्मिती केली. गेल्या ३६ वर्षात १५ हजारापेक्षा जास्त प्रवचने दिली. भारतीय संस्कृतीचे सार साऱ्या जगाला कळावे, हा त्यामागचा उद्देश आहे.
प्रश्न : आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोणते कार्य केले?
उत्तर : महत्वाचे म्हणजे, हल्ली वाचलं जात नाही, असं म्हटलं जातं. पण आम्ही भक्तीकोष निर्माण केला आणि १० हजारची एक आवृत्ती संपून गेली. गीतासागर हा ग्रंथही मान्यता पावला आहे. समाजाला वाङमयाची गोडी आहे. वाङमय व साहित्य यामध्ये भेद आहे. बहुतांशी साहित्य हे पुरस्कार डोळ्यासमोर ठेवून लिहीलं जातं, वाङमय हे समाजहितासाठी लिहीलं जातं. साहित्य हे २-३ पिढ्या टिकते तर वाङमय शाश्वत राहते. आता आदित्य प्रतिष्ठान ही संस्था अमेरिकेतही पोहोचली आहे.
प्रश्न : आपण अध्यात्मिक क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे. आपल्याला वाटतं का,की समाज सुधारेल?
उत्तर : कोणत्याही राष्ट्राची निर्मिती मोठमोठ्या इमारती वा रस्ते बांधून होत नाही तर चांगले नागरिक किती, यावर होत असते. समाजातील सत्वगुण वाढावा, हाच आमचा उद्देश आहे. आजचं शिक्षण हे माणूस घडवणारं नाही, हे दुर्दैव आहे. शिक्षणाचे ध्येय हे माणूस घडवणारे असले पाहिजे, पण ते आज नाही. तसं असतं तर समाज नक्कीच जास्त सुधारला असता.
प्रश्न : तुम्ही अनेक देशांमध्ये प्रवचन दिली आहेत. भारतीय संस्कृतीचा परदेशांमध्ये कितपत प्रभाव जाणवतो?
उत्तर : आपल्या संस्कृतीमध्ये संपूर्ण जगाला कुतुहल आहे, उत्सुकता आहे. अमेरिका हे अध्यात्मिक घरातील हॉल आहे, चीन, श्रीलंका हे माजघर आहे. आणि भारत हे देवघर आहे. भारतातील अध्यात्मिक ज्ञानाचा जगावर पगडा आहे. आमच्या भक्तीकोशाला स्पॅनिश, जपानकडूनही भाषांतरणासाठी विचारणा होत आहे. यावरुनच आपल्याला भारतातील अध्यात्मिक शक्तीची प्रचिती येईल.
वैश्विक संत विद्यापीठाची संकल्पना काय आहे?
लोणावळ्यानजीक एक्सप्रेस हायवेनजीक या विद्यापीठाचे बांधकाम करण्यात येत आहे. यात गुरुकुल शाळा, महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था ज्यामध्ये २ लाख ग्रंथ असतील. संतांवर मुलभूत संशोधन होईल. भारतात अनेक संत होऊन गेले जे आपल्याला माहीतही नाहीत. उदाहरणार्थ तामिळनाडूत अल्वार, राज्यस्थानमध्ये मीरा, काश्मिरमध्ये लल्लेश्वरी, परमानंद, बंगालमध्ये चैतन्यप्रभू, बिहारमध्ये सरिया असे अनेक संत झाले. वैश्विक संत विद्यापीठात या संतांसाठी दोन मोठी संग्रहालये असतील. १०० फूट उंचीचे प्रवेशव्दार असेल, गोशाळा असेल. गरिबांना येथे रोजगार देण्याचा मानस आहे. याठिकाणी १ एकरवर सरोवर निर्माण केलं आहे. यामध्ये आजच्या घडीला १ कोटी लिटर पाणी आहे. याठिकाणी वनराई क्षेत्र वाढवण्याचा मानस आहे. पुढील पाच वर्षात हे सर्व काम पूर्ण होईल. यासाठी १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणी गोबरगॅस, सौर ऊर्जा तयार होणार आहे.