विद्यापीठाचा निर्णय, विधी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना रिड्रेसलसाठी २५ पर्यंत मुदत
By अमित महाबळ | Published: April 17, 2023 08:22 PM2023-04-17T20:22:55+5:302023-04-17T20:23:26+5:30
विधि अभ्यासक्रमाच्या निकालात त्रुटी असल्याने उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
जळगाव : एलएलबी आणि एलएलएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन विषयांच्या फेरतपासणीसाठी (रिड्रेसल) दि. २५ एप्रिलपर्यंत मुदत मिळाली आहे. सोमवारी, विद्यापीठाने हा निर्णय घेतला.
विधि अभ्यासक्रमाच्या निकालात त्रुटी असल्याने उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने विधि महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक प्रतिनिधी यांच्या समवेत कुलगुरूंनी बैठक घेतली. या बैठकीतील निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी एलएलबीच्या सहा आणि एलएलएमच्या दोन विषयांच्या उत्तरपत्रिकांचे रँडमली मूल्यांकन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झालेला आढळून आला नाही. विद्यापीठ नियमानुसार उत्तरपत्रिकेत एकूण गुणांमध्ये १० टक्के बदल झाला तरच तो ग्राह्य धरला जातो.
विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजण्यासाठी सोमवारी, कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत विधि महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व अधिकार मंडळाचे काही सदस्य यांची बैठक घेण्यात आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक दीपक दलाल यांनी माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत विद्यापीठाच्या अध्यादेशाप्रमाणे दोन विषयांसाठी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका रिड्रेसलला टाकण्याची संधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दि. २५ एप्रिलपर्यंत रिड्रेसलची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या बैठकीत प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, प्राचार्य विजय बहीरम, प्राचार्य नितेश चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, ॲड. केतन ढाके, केदारनाथ कवडीवाले, राहुल पाटील उपस्थित होते.