विद्यापीठात निवडणुकांच्या हालचालींना वेग
By Admin | Published: May 24, 2017 12:33 AM2017-05-24T00:33:44+5:302017-05-24T00:33:44+5:30
निवडणूक लढवू इच्छिणाºया प्रतिनीधींची २९ ला बैठक : ३० रोजी निवडणूक कार्यक्रम होणार जाहीर?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशसनाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांसाठी दहा जागांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पदवीधरांचे माजी प्रतिनिधी तसेच पदवीधर गटातून निवडणूक लढवू इच्छिणाºया विद्यार्थी प्रतिनीधींच्या बैठकीचे आयोजन २९ मे रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठात करण्यात आले आहे.
१ मार्च रोजी अकृषी विद्यापीठांसाठी नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार विविध प्राधिकरणाच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. प्राधिकरणाचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठीच्या पात्रता व अटी शासनाकडून २९ एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात आधीच जाहीर करण्यात आल्या आहेत.
या विषयांवर होणार चर्चा
सुधारित विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांसाठी दहा जागांची तरतूद करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या चर्चेसाठीच २९ मे रोजी विद्यापीठात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत पदवीधरांच्या नोंदणी संदर्भात चर्चा करणे, सन २०१७ चे एकरुप परिनियम क्रमांक २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नमून्यात अर्ज भरणे, विहित शुल्क व दस्तऐवजांसह अर्ज जमा करणे याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीसाठी पदवीधरांचे माजी प्रतिनीधी व निवडणूक लढवू इच्छिणाºया विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी व प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले आहे.
नवीन नावनोंदणी करण्यात येईल
दरम्यान यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यानुसार २०१५ मध्ये विद्यापीठाची विविध प्राधिकरणे गठित करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी नोंदणीकृत पदवीधरांचे नोंदणी अर्ज व ज्यांनी पूर्वी नोंदणी केली होती त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची कार्यपध्दती अवलंबिण्यात आली होती. मात्र आता नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यामुळे पदवीधरांची नव्याने नाव नोंदणी करण्यात येणार आहे.
३० मे पर्यंत निवडणूक कार्यक्रम होणार जाहीर
प्राधिकरण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचे नियम व अटींची माहिती देण्यास शासनाकडून उशीर झाला असला तरी, उमवि प्रशासनाने निवडणुकांसाठी मार्च महिन्यातच तयारी सुरू केली होती.
त्यानुसार विद्यापीठाने निवडणूक कार्यालयदेखील सुरू केले होते. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार हे कुलगुरूंकडे आहेत. ३० मे रोजी कुलगुरू निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. प्राधिकरण निवडणुका शांततेत व बिनविरोध पार पाडण्यासाठी उमवि प्रशासनाकडून सध्या प्रयत्न सुरू असले तरी, बिनविरोध निवडणुका न झाल्यास त्या दृष्टीनेदेखील विद्यापीठाची तयारी आहे. निवडणूक खर्चासाठी उमविने १ कोटींची रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात याआधीच केली आहे.