विद्यापीठ प्रशाळांमध्ये आकारले जाणार चार टप्प्यात प्रवेश शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:43 PM2020-07-26T12:43:29+5:302020-07-26T12:46:12+5:30

विद्यार्थी हिताचा विचार

University schools will charge a four-stage admission fee | विद्यापीठ प्रशाळांमध्ये आकारले जाणार चार टप्प्यात प्रवेश शुल्क

विद्यापीठ प्रशाळांमध्ये आकारले जाणार चार टप्प्यात प्रवेश शुल्क

Next

जळगाव : सध्या प्रथम शैक्षणिक वर्ष सोडून उर्वरित अभ्यासक्रम १ आॅगस्टपासून व प्रथम वर्ष १ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शैक्षणिक शुल्क घेण्यासाठी आॅनलाईन पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध केली जात आहे. विद्यार्थ्यांकडून हे शैक्षणिक शुल्क टप्प्याटप्याने कसे आकारले जाईल याची सुद्धा काळजी घेण्याचे महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशाळांमध्ये तर हे प्रवेश शुल्क चार टप्प्यात आकारले जाणार आहे. आर्थिक मंदी लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ पासून लागू होणारी शुल्क वाढ तूर्त या वर्षासाठी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली़
कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे सर्व क्षेत्रात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मते मांडली. ते म्हणाले की,
कोरोना पूर्वीचे व कोरोनोत्तर जग यामध्ये मोठी तफावत असणार आहे. उच्च शिक्षण क्षेत्र देखील याला अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर काही नवे बदल विद्यापीठांना आत्मसात करावे लागणार आहेत. कोरोनाचे संकट नाहीसे होत नाही तोवर आॅनलाईन शिक्षणाचा एक पर्याय विचारात घेतला जात असला तरी आपल्या विद्यापीठाचे कार्यक्षेत्रात आदिवासी, दुर्गम भाग देखील अधिक आहे. त्याचाही विचार करावा लागेल. तूर्त विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संलग्नित महाविद्यालयांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित यासाठी महाविद्यालयांकडून आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे तात्पुरता प्रवेश सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात अध्यापनास येतील़ त्यावेळी प्रवेशासाठी आवश्यक मुळ कागदपत्रे तपासून त्यांचा प्रवेश निश्चित व नियमित करावा असे सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल. विद्यापीठ प्रशाळा व विभागातील प्रथम वर्ष सोडून उर्वरित वर्गामध्ये प्रवेश घेण्याची सोय देखील २८ जुलै पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत जो निर्णय होईल त्यानंतर पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबत सूचना दिल्या जातील.
प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण सुरु
आॅनलाईन अध्यापनासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले का? असे विचारले असता कुलगुरु म्हणाले की, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापक हे आॅनलाईन शिक्षणासाठी तयार व अद्ययावत व्हावेत यासाठी २० ते ३१ जुलै पर्यंत सर्व विद्याशाखांच्या प्राध्यापकांचे प्रशिक्षण घेतले जात आहे. आता अध्ययन व अध्यापनाच्या नव्या पद्धती स्वीकाराव्या लागतील.आॅनलाईन शिक्षणावर भर दिला जाऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांना या बदलाची जाणीव करून देत अध्यापन शिक्षण प्रक्रियेत ई-लर्निंग नमुना रूपांतर करून पुढील स्तरावरील अध्यापन शिक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आॅनलाईन लर्निंग लाईव्ह क्लासरूम टिचिंग प्लॅटफॉर्म स्थापन करून या अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण होत असून याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
कोरोनामुळे जे-जे नवे बदल शिक्षण क्षेत्रात आता येऊ घातले आहेत. या बदलांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे सामोरे जाण्याच्या तयारीला लागले आहे.
-प्रा़ पी़पी़पाटील, कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

Web Title: University schools will charge a four-stage admission fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव