वेतन आयोगासाठी विद्यापीठ कर्मचारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:04 PM2019-06-19T12:04:53+5:302019-06-19T12:05:22+5:30
उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना निवेदन
जळगाव : सातवा वेतन आयोग लागू करा, शिक्षकेत्तर पदांच्या संदर्भात ३० टक्के पद कपातीचे धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यासांठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रशांत मगर यांना सादर करण्यात आले.
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आॅफिसर्स फोरम शाखा या संघटनांच्या वतीने आपल्या विविध मागण्यासांठी १८ जून रोजी सकाळी ११ वाजता उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मैदानावरुन मोर्चाला सुुरुवात झाली. विविध संघटनांचे विद्यापीठातील एकूण २५० ते ३०० कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे, यांच्यासह राजेश सोनवणे, सुभाष पवार, महेश पाटील, एस. आर. पाटील, आधार कोळी, एस. आर. गोहील, शिवाजी पाटील, विकास बिºहाडे, सचिन सोनकांबळे, पद्माकर कोठावदे, अरविंद गिरनारे, मृणालिनी चव्हाण आदी कर्मचाºयांनी मोर्चा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी
शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच हा मोर्चा उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयावर धडकल्यानंतर या ठिकाणीदेखील विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी या वेळी जोरदार मागणी लावून धरण्यात आली.