विद्यापीठाने माफ केली ‘सुपर लेट फी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:47+5:302021-07-29T04:17:47+5:30
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - सद्य:स्थितीतील कोविडजन्य परिस्थिती विचारात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र ...
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - सद्य:स्थितीतील कोविडजन्य परिस्थिती विचारात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सुरू असलेल्या माहे मार्च, एप्रिल, मे २०२१ च्या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरण्याचे राहून गेले आहे, त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज सुपर लेट फी शिवाय स्वीकारावेत, असा निर्णय बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत घेण्यात आला.
प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल/मे २०२१ परीक्षा सध्या सुरू आहेत. उर्वरित राहिलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे राहून गेले आहेत. त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी लागणारी सुपर लेट फी माफ करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भातचे परिपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.के.एफ. पवार यांनी दिली.