विद्यापीठाचा ‘विज्ञान रथ’ दोन वर्षापासून अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:02 PM2019-08-13T12:02:40+5:302019-08-13T12:02:50+5:30
विज्ञान प्रसाराचे नुसतेच नाव
जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठाकडून ‘फिरते विज्ञान रथा’ची निर्मिती करण्यात आली होती़ मात्र, तब्बल दोन वर्षांपासून हा विज्ञान रथ विद्यापीठाच्या एका गोडावूनमध्ये अडगळीत पडून आहे. विज्ञान रथ तयार करणारे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ महाराष्ट्रातलं पहिले होते़
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि आदिवासी भाग येतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी विद्यापीठ व केरला स्टेट सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी म्युझिअम आणि प्रियदर्शनी तारांगण, त्रिवेंदम यांच्यात माजी कुलगुरू डॉ़ के ़बी़पाटील यांच्या कार्यकाळात सामंजस्य करार करून विज्ञान रथाची निर्मिती करण्यात आली होती़ तब्बल ३८ लाख रूपये खर्च करून हा रथ तयार करण्यात आला होता़
विज्ञान रथात २४ वर्कींग मॉडेल्स
या रथामध्ये न्यूटन कँडल्स, बॉल, पायथागोरसचा सिद्धांत, फ्लोटिंग मॅॅग्नेट, मॅग्झिमम एरिया, इमेज, लेझी ट्यूब, इलेक्ट्रो मॅग्नेट, कलर फ्लोटिंग मॅजिक, डान्सिंग रिंग्ज, जंपिंग डिस्क, ब्लॅक बॉडी रेडिएशन, कलर मिक्सिंग, मॅकेनिकल स्कॅनर, म्युच्युअल इंडक्शन, व्होरेटेक्स, मिरर इमजे, कॅलिडोस्कोप, डबल कोन रोलिंग अप हिल, टनेल, जनरेशन आॅफ इलेक्ट्रिसिटी अशा तब्बल २४ वर्किंग मॉडेल्सचा समावेश आहे.
दुरूस्तीसाठी पत्रव्यवहार पण, पुढे काहीही नाही
विज्ञान रथाच्या दुरूस्तीसाठी त्रिवेंदम येथील संस्थेशी विद्यापीठाकडून पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचे समजते़ मात्र, दोन वर्षात पाठपुराव्याच्या अभावामुळे कुठल्याही हालचाली न झाल्यामुळे विज्ञान रथ हा पडून आहे़ यासाठी विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज आहे़ दरम्यान, या याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृ ती खराब असून रूग्णालयात दाखल असल्याचे सांगत माहिती देण्यास टाळले़
दरवाजे व मॉडेल्स नादुरूस्त
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण करणारा रथ मात्र, दोन वर्षांपासून ना-दुरूस्त आहे़ रथातील दरवाजे सोबतच काही मॉडेल्स हे काम करित नसल्यामुळे हा रथ शिक्षण भवनाजवळील एका गोडावूनमध्ये अडगळीत पडलेला आहे़ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रथ गोडावूनमध्ये पडून असल्याची ओरड आहे़ आजही या रथाची मागणी होत असताना विद्यापीठाच्या दुर्लक्षामुळे निव्वळ रथ पडून आहे़