अनावश्यक वापर केल्यास यकृत, किडनीवर होतो रेमडेसिविरचा दुष्परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:26+5:302021-04-16T04:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड १९ चा रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाला, की त्याला सर्रास रेमडेसिविरचा डोस दिला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड १९ चा रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाला, की त्याला सर्रास रेमडेसिविरचा डोस दिला जातो. मात्र, त्यात चूक झाल्यास त्याचे रुग्णांना गंभीर दुष्परिणाम सहन करावे लागतात. त्यात रुग्णाच्या यकृत आणि किडनीवर त्याचा परिणाम होतो. तसेच रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर देखील त्याचे दुष्परिणाम होतात. रेमडेसिविर हे औषध या आधी इबोला या व्हायरससाठी वापरले गेले आहे. ते कोविड १९ साठी तयार करण्यात आलेले नाही. मात्र, योग्य वेळी ते दिल्यास ते कोरोनावर देखील परिणामकारक ठरू शकते. मात्र, ते सर्रास दिले जाऊ नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रेमडेसिविर कुणाला द्यावे
रेमडेसिविर हे इंजेक्शन कुणाला दिले जावे याबाबत बोलताना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील औषधवैद्यक शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले की, रेमडेसिविर हे एक ॲन्टी व्हायरल ड्रग आहे. ते देताना रुग्णाला कोविड १९ न्यूमोनिया असावा. त्याची ऑक्सिजन लेव्हल ९५ च्या खाली गेलेली असावी. एक्स रेमध्ये एचआर सिटी स्कोअर हा ९ पेक्षा जास्त असावा. लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट करावी. त्यातील अहवालानुसार रेमडेसिविर द्यावे की नाही हे ठरवावे.’ रेमडेसिविरच्या दुष्परिणामांबाबत त्यांनी सांगितले की, यामुळे रुग्णाच्या यकृत आणि किडनीवर वाईट परिणाम होतात. काहींना काविळ होण्याची भीती असते. तसेच रक्त गोठण्याची प्रक्रियादेखील वाढू शकते.’
रेमडेसिविर कुणाला देऊ नये
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय गायकवाड यांनी सांगितले की, ‘ गरोदर महिला, लहान मुले यांना हे इंजेक्शन देता येत नाही. तसेच ज्यांना किडनीचे विकार आहेत किंवा लिव्हरचे इतर आजार आहेत. त्यांना देखील हे औषध देता येत नाही.
हे आहेत रेमडेसिविरचे दुष्परिणाम
रेमडेसिविरच्या दुष्परिणामांबाबत बोलताना डॉ. विजय गायकवाड यांनी सांगितले की, ‘तात्काळ होणारे दुष्परिणाम हे श्वास घ्यायला त्रास होणे, इतर ॲलर्जी हे आहेत. मात्र किडनी आणि यकृत खराब होणे, हे मुख्य दुष्परिणाम आहेत. तसेच चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे हे देखील त्याचे मोठे दुष्परिणाम आहेत.’