विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर्सद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:31+5:302021-03-25T04:16:31+5:30
ममुराबाद : गिरणा व तापीनदीच्या पात्रातून वैध तसेच अवैध मार्गाने उत्खनन करून आणलेली वाळू वाहणाऱ्या विनाक्रमांकाच्या व योग्यता प्रमाणपत्र ...
ममुराबाद : गिरणा व तापीनदीच्या पात्रातून वैध तसेच अवैध मार्गाने उत्खनन करून आणलेली वाळू वाहणाऱ्या विनाक्रमांकाच्या व योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या ट्रॅक्टरसारख्या वाहनांनी परिसरात सध्या हैदोस घातला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच महसूल विभाग व पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असून संबंधितांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
गिरणा नदीपात्रातुन चोरटी वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रेलर व विना योग्यता प्रमाणपत्र मालवाहतुक करणाऱ्या डंम्पर यांच्या विरोधात आरटीओ कार्यालयातर्फे विशेष धडक तपासणी काही महिन्यांपूर्वी राबविण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाकडून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर नियंत्रण ठेवुन नदी पात्रातुन होत असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी व दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले होते. सदरची मोहीम पोलीस व महसुल विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे सुरुच राहणार असल्याची माहिती दरम्यानच्या काळात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. प्रत्यक्षात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सुरू केलेली धडक मोहीम थंडावली. विना क्रमांकाचे ट्रॅक्टर्स व इतर वाळू वाहतूक करणारी वाहने राजरोसपणे धावताना दिसून आली. परिवहन विभाग किंवा पोलीस व महसूल प्रशासन यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे त्यामुळे चांगलेच फावले. आपण पकडले गेलो आणि वाहन जमा झाले तरी आपले काहीच होणार नाही, अशा अविर्भावात संबंधित वाहनचालक बिनधास्त होऊन वावरत असल्याचे आता दिसून येत आहे. भरधाव वेगाने वाहन पळवित असताना रस्त्यात कोणी आडवा गेल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची कोणतीही जाणीव न ठेवणाऱ्या या वाळू तस्करांमुळे विशेषतः ग्रामीण भागात सध्या मोठे भीतीचे वातावरण आहे.
अधिकाऱ्यांची छुपी मदत ?
- आरटीओ तसेच महसूल विभागाकडून दुर्लक्ष झाल्यानंतर गावपातळीवर कार्यरत तलाठीदेखील वाळू वाहनांची अडवणूक करण्यास मागेपुढे पाहतात. वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडण्यासाठी बरेच तलाठी पुढे येत नसल्यामुळे सध्या वाळू तस्करांचे चांगलेच फावत आहे.
- गिरणा नदीच्या पात्रातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर सर्वाधिक मागणी असलेल्या ममुराबाद, असोदा, भादली गावांकडे विनाअडथळा जाऊ देण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडूनच छुपी मदत केली जाते. त्यामुळे एकदाचे वाळू ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर पडले की त्यास कोणीच अडविण्याची हिंमत करीत नाही. उलट रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न केला जातो, असाही आरोप करण्यात आला आहे.