पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:09+5:302021-03-21T04:16:09+5:30
जळगाव : एक महिन्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ...
जळगाव : एक महिन्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी मका, गहू, हरभरा, ज्वारी पिके आडवी पडली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळीराजावर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे.
अतिपावसामुळे फटका बसल्यानंतर रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असलेल्या बळीराजाला दर महिन्याला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याला एक महिना होत नाही तोच पुन्हा शनिवार, २० मार्च रोजी अवकाळी पावसाचा जिल्हाभर तडाखा बसला.
हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार गेल्या दोन दिवसांपासूच अधूनमधून पावसाचे वातावरण होत होते. त्यात शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यात जळगाव तालुक्यात कुऱ्हाडदे येथे वीज पडून हरि रामदास न्हाळदे यांच्या मालकीची म्हैस दगावली. तसेच जळगाव शहरासह वडली, म्हसावद, वावडदा, पाथरी या भागातही वादळ, विजांचा गडगडाट झाला. बोदवड तालुक्यात मका आडवा झाला असून जळगाव तालुक्याकही केळी, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांनाही फटका बसला. जिल्ह्यातील बहुतांश भागात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्यानंतरच एकूण नुकसान स्पष्ट होणार आहे.