‘अवकाळी’चा मेथी-कोथिंबीरला मार! लिंबूने उत्पादकांनाच पिळले; हंगाम संपल्याने आलेही महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 06:06 PM2023-04-30T18:06:47+5:302023-04-30T18:07:05+5:30
अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे भाजीपाल्यांच्या दरात मोठा बदल झाला आहे.
कुंदन पाटील
जळगाव: अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे नुकसान झालेल्या मेथीसह कोथिंबीरच्या आवकमध्ये घट झाल्याने ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने विक्री होणारी कोथिंबीर आता ८० ते १०० रुपयांवर गेली आहे. मेथीनेही दराची सत्तरी ओलांडली आहे.
यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात सातत्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळासह गारपीटही झाली. त्यामुळे पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे मेथी, कोथिंबीरची आवक घसरली आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबीर ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने विक्री होत होती. आता मात्र ८० ते १०० रुपयाचा भाव घेत आहे.मेथीला अवकाळीचा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पन्नाला मार बसल्याने दर्जाही घसरला आहे. साहजिकच मेथीच्या आवकमध्ये घट निर्माण झाली आहे. त्यामुळे ४० ते ५० रुपये दर असणारी मेथी आता ७० ते ८० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.
लिंबूने उत्पादकांना पिळले
यंदा उन्हाळ्यासारखी परिस्थिती नाही. तसेच काढणीवर आलेला लिंबूला वादळाचाही फटका बसतो आहे. त्यामुळे बहुसंख्य उत्पादकांनी लिंबूला बाजारात आणले आहे.त्यामुळे लिंबूची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे शंभरावर असणारा लिंबू आता ७० रुपये किलोचा भाव घेत आहे. त्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
आले महागले
हंगाम संपल्याने 'आल्या'ची आवक घटली आहे. त्यामुळे १०० ते १३० रुपये प्रतिकिलोने विक्री होणारे आले आता १५० ते १६० रुपयांवर गेले आहे. पावसाळ्यात उत्पादन निघायला लागल्यावरच आल्याचे दर घसरतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
काय म्हणतो भाजीबाजार?
भाजी- किलोचा दर
- भेंडी- ५० ते ६०
- मिरची (जाड)-३० ते ४०
- मिरची बारिक-४० ते ५०
- काकडी-२० ते २५
- गाजर-३० ते ४०
- पत्ताकोबी-२० ते २५
- वांगी-३० ते ४०
- टमाटे-१५ ते २०
- लिंबू-७० ते ८०
- मेथी-७० ते ८०
- कोथिंबीर-८० ते १००