भुसावळात बेमोसमी पावसामुळे साथीचे आजार बळावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:41 PM2019-11-10T15:41:05+5:302019-11-10T15:43:05+5:30
मान्सुनोत्तर पावसाने गेल्या पंधरवड्यात थैमान घातल्यानंतर आता नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : मान्सुनोत्तर पावसाने गेल्या पंधरवड्यात थैमान घातल्यानंतर आता नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये, परिसरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सद्य:स्थितीत टायफाईड, मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहे. रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नगरपालिका व आरोग्य विभागाच्या वतीने तत्काळ खबरदारीचे उपाय योजना करण्याची गरज आहे.
अवकाळी पावसाने पावसाळ्यानंतरही थैमान घातले. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जगाच्या पोशिंद्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरदेखील पावसाचा परिणाम झाला आहे. भुसावळ शहरासह तालुक्यात टायफाईड, मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
दिवसागणिक या रोगांच्या रुग्णांची संख्या वाढतच आह.े लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. मात्र नगरपालिका व आरोग्य विभाग नागरिकांचे आरोग्य धोक्यात असूनसुद्धा तत्पर दिसत नसल्याची नागरिकांची व्यथा आहे.
शहरातील अनेक नगरसेवकांनी स्व-खर्चाने आपल्या प्रभागांमध्ये धुरळणी केली आहे. या आजारांवर नियंत्रण न मिळाल्यास रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस थांबून येत असला तरी वातावरणाच्या बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषत: लहान मुले व वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जीव घेणे साथीचे आजार थांबवण्याच्या दृष्टीने नगरपालिका व आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपाययोजना कराव्या याकरिता प्रशासनाला निवेदन दिले आहे.
आमदारांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक
शहरात साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. गल्ली-बोळात नागरिक साथीच्या आजारांनी बेजार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संजय सावकारे यांनी पालिका प्रशासन व आरोग्य े अधिकारी यांना बोलावून तातडीने उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच शहरातील इतर गंभीर समस्यांविषयीही तत्काळ मार्ग काढण्यात यावा यासाठी आधीच अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.