हृदयाचे ठोके बंद होईपर्यंत सुरीने चिरला तरुणाचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:43 AM2019-10-06T11:43:19+5:302019-10-06T11:43:53+5:30
डोंगरकठोरा येथील खून प्रकरण : बहिणीशी अनैतिक संबंध आणि प्रेयसीशी सलगीचा प्रयत्न बेतला जीवावर
जळगाव : पायाला कशाने तरी चावा घेतला, असे सांगून मागेच थांबला अन् पाय बघण्याच्या निमित्ताने खाली वाकून दगड उचलून बेसावध असलेल्या शरीफ मेहरबान तडवी याच्या डोक्यात मागून दगड टाकला. या हल्लयात तो जमिनीवर कोसळला आणि परत त्याच्या डोक्यात आणखी दगड टाकला. सोबत आणलेल्या सुरीने शरीफचा गळा चिरला...याही स्थितीत शरीफने हातातील सुरी हिसकावून संशयिताच्या हातावर वार केला. संतापलेल्या संशयिताने गंभीर जखमी झालेल्या शरीफच्या मानेवर पाय ठेवला आणि परत आणखी एकदा गळा चिरला...त्यानंतर तो मृत झाला की नाही म्हणून छातीचे आणि हाताचे ठोके तपासले. ह्दय बंद असल्याची खात्री झाल्यानंतर दुसऱ्या मार्गाने घर गाठले. डोंगरकठोरा, ता.यावल येथील खूनाच्या घटनेतील आरोपी सचिन (संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने नाव बदलले आहे.) यानेच पोलिसांसमोर ही घटना कथन केली.
शरीफ मेहरबान तडवी (१९) या तरुणाचा दगडाने ठेचून आणि चाकूने गळा चिरुन खून झाल्याची घटना ३ रोजी उघडकीस आली. स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांनी दुसºयाच दिवशी गुन्ह्याची उकल केली. मृत शरीफला आलेला शेवटचा फोन गुन्हा उघडकीस आणण्यात महत्वाचा ठरला आहे. २ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता शरीफ घरात जेवण करीत असताना संशयित सचिन याने शरीफला फोन करुन घराबाहेर बोलावले. त्याला त्याने तेल्या नाल्याकडे नेले. परत येताना मोबाईलची बॅटरी बंद केली. पायाला माकोडा किंवा विंचू अशा काही तरी किड्याने चावा घेतल्याचे सांगून ते बघण्याच्या नावाखाली सचिन खाली वाकला आणि शरीफला तु चल असे सांगितले. तो पुढे चालायला लागला. तो बेसावध असल्याचे पाहून सचिन याने शरीफच्या डोक्यात दगड टाकला.
एलसीबीला गवसला धागा... तरुण मुलाचा खून झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी तातडीने अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना घटनास्थळी रवाना केले. उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, निरीक्षक रविकांत सोनवणे, सहायक निरीक्षक सारिका खैरनार या गुन्ह्याच्या तपासात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, सहायक फौजदार विनय देसले, रा.का.पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, संजय सपकाळे, सुरेश महाजन व गफूर तडवी यांनी मृत शरीफचे घर गाठून चौकशी केली असता रात्री घरातील सर्व जण जेवण करीत असताना साडे आठ वाजता शरीफ याला कोणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर गेला तो कायमचाच. या पथकाने हाच धागा पकडून तपासाची चक्रे फिरवली असता तो फोन सचिनच्या काकाकडे असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा येथेच कुठे तरी धागा आहे याची खात्री झाल्यानंतर पथकाने काकाला गावाच्या बाहेर नेले, सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देणाºया काकाला‘खाकी’ हिसका दाखविला तो पोपटासारखा बोलू लागला. या घटनेत पुतण्या सचिनचा संबंध असल्याचे सांगितल्याने पथकाने सचिनला ताब्यात घेतले.
प्रेम आणि अनैतिक संबंधाची किनार
सचिन याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बहिणीसोबत शरीफचे अनैतिक संबंध असावेत असा संशय होता. दोन ते तीन वेळा त्याला बहिणीशी गैरवर्तन करताना पाहिले होते. त्याला त्याबाबत समजावण्यात आले होते. अशातच माझ्या प्रेयशीशी देखील तो सलगी करुन गैरवर्तन करीत होता..त्यामुळे शरीफ डोक्यात बसला आणि याला कायमचेच संपवायचे म्हणून तीन दिवस शांत डोक्याने विचार करुन त्याच गेम केला..अशी कबुली सचिन याने दिली आहे. काम झाल्यानंतर सोबत आणलेला चाकू आजोबाच्या घरात तर कपडे एका पिशवीत ठेवले..मात्र खुनाची माहिती कोणालाच सांगितली नाही असेही त्याने सांगितले.