चाळीसगाव येथे नव्या वीज मीटर विरोधात बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 05:00 PM2019-08-06T17:00:30+5:302019-08-06T17:01:29+5:30
वीज वितरण कंपनीच्या वतीने नव्या वीज मीटरचे ग्राहकांना दुप्पट व तिप्पटचे वीज बिल येत असल्यामुळे नव्या वीज मीटर विरोधात रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ६ रोजी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली.
चाळीसगाव, जि.जळगाव : वीज वितरण कंपनीच्या वतीने नव्या वीज मीटरचे ग्राहकांना दुप्पट व तिप्पटचे वीज बिल येत असल्यामुळे नव्या वीज मीटर विरोधात रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ६ रोजी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली.
शहरात गेल्या एक महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीचे ठेकेदार घरी येऊन अचानकपणे जुने इलेक्ट्रॉनिक वीज मीटर काढून त्या ठिकाणी नव्या पद्धतीचे रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवत आहेत. पूर्वीच्या वीज मीटरचे बिल व आता नवीन बसविण्यात येणारे वीज मीटरच्या बिलात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून आली आहे. जुन्या मीटरचे १०० युनिट पडले असतील तर त्याच वेळेस नवीन मीटरचे ३०० युनिट म्हणजेच जवळपास ३ पट जास्तीचे युनिट पडून ग्राहकांना जास्तीचे बिल भरावे लागणार आहेत.
उपोषणाला रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, स्वप्नील गायकवाड, सूर्यकांत कदम, ज्ञानेश्वर कोल्हे, विकास बागड, सचिन नागमोती, योगेश पाटील, विलास मराठे, मुकुंद पवार, समाधान मांडोळे, प्रदीप मराठे, गोपाल देशमुख, गौरव पाटील, अनिकेत शिंदे, गणेश निकुंभ, सुधीर शिंदे, संतोष निकुंभ, भाऊसाहेब सोमवंशी, जयदीप पवार, सागर पाटील, अभिमन्यू महाजन, दीपक देशमुख, शुभम पाटील, तर युनिटी क्लबचे स्वप्नील कोतकर, मनीष मेहता, हेमंत वाणी, भूपेश शर्मा, निशांत पाठक, सतीश जैन यांचा समावेश आहे.
चाळीसगाव येथे नव्या वीज मीटरविरोधात उपोषणाला बसलेले रयत सेना व युनिटी क्लबचे पदाधिकारी व कार्येकर्ते.