‘लोकमत रक्ताचं नातं’ लोगोचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:51+5:302021-06-16T04:21:51+5:30
जळगाव : ‘लोकमत’चे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे अभियान जिल्ह्यात राबविले जाणार ...
जळगाव : ‘लोकमत’चे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे. त्यासाठी विशेष असा लोगो तयार करण्यात आला असून सोमवारी महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्याहस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुलातील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम झाला.
महापौर जयश्री महाजन यांनी ‘लोकमत’च्या अभियानाचे कौतुक करून कोविडसारख्या गंभीर परिस्थितीत रक्ताचे नातं नसताना अनेकांना मदत केली आहे. लोकमतने रक्ताचं नातं हे अभियान हाती घेतले आहे, त्यामाध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून गरजूंना मदत करावी, असे आवाहन केले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी लोकमतने जिल्हा व राज्यात रक्ताचं नातं ही मोहीम सुरु करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो कौतुकास्पद आहे. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ’ दान आहे. राज्यात कोणालाही रक्ताची कमतरता भासू नये यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी यांनी जन्मत: रक्ताचे नाते निर्माण होतात असे म्हटले जाते, मात्र रक्तदान करून खऱ्या अर्थाने रक्ताचे नाते निर्माण होते. लोकमत समूहाने ‘रक्ताचं नातं’ हे अभियान हाती घेतले आहे, त्यात नागरिकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन केले. यावेळी लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले व उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी उपस्थित होते.