अगडबंब प्लेट- लाँंचमधील जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:47 AM2019-04-08T00:47:09+5:302019-04-08T00:47:30+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शेजारच्या देशात या सदरात लिहिताहेत बांगला देशात प्रवास करून आलेले जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह... लेखमालेचा आज चौथा भाग...
बांगला देशातील प्रवासा दरम्यान आम्ही आॅर्डर दिल्याप्रमाणे वेटरने दाल-भात आणले. त्यातली भाताची प्लेट आणली. ती पाहून मी थक्कच झालो. एक भाताची किंवा ‘खिचरी’ची प्लेट म्हणजे एकात पाच-सहा लोक जेवतील अशी अगडबंब. प्लेट चांगली दोन वीत लांब, दीड वीत रुंद आणि त्यात वितभर उंच भाताचा ढीग. दहा प्लेट ‘खिचरी’चे काय झाले असते. त्याचा मी फक्त विचारच करीत राहिलो. पण सोबतच्या लोकांना भात खाताना पाहून मात्र चाट पडलो. पाचही बोटांनी मूठ वळून ते भात कालवतात. त्यात कालवायला काही हवेच असेही नाही आणि तो मोठमोठे गोळे करून पाचही बोटांनी असा काही वेगात खातात की ती अगडबंब प्लेट एक माणूस अगदी दहा मिनिटातच सहज खाऊ शकतो, याची अजिबात शंका माझ्या मनात उरली नाही. पुलंच्या ‘वंगचित्रे’मध्ये बंगाली माणसाच्या खाण्याचे वर्णन माझ्यासमोर अक्षरश: ‘खाबो’ताना मी पाहत होतो.
मी मात्र त्यांच्या मानाने अगदीच कच्चा लिंबू होतो. मी दोन वेळा थोडाथोडा भात घेतला. त्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांनी एकदाच घेऊन माझा पहिला संपायच्या आत संपवलासुद्धा. मी कधी दाल तर कधी ‘मिक्शवेज’ कालवून खात होतो ते त्यांना फारच अडाणीपणाचे वाटले असावे. त्यांनी सगळे सामिष भोजन आणि भातही माझ्या कितीतरी आधी संपवले. मी त्यांच्या मानाने खूपच हळू जेवतोय हे पाहून उगीचच माझे मलाच अपराधी वाटून गेले.
खाण्याच्या पदार्थांचा आकार सगळ्याच बाबतीत चांगला जम्बो. पुढे नारायणगंजला तिथले ‘रोशोगुल्ला’ आणि गुलाबजाम प्रसिद्ध म्हणून समोर आले. एकेक चांगले मोसंबी एवढे. खव्वय्ये असे म्हणतात की ‘रोशोगुल्ला’ अंगठा आणि तर्जनी यात धरावा आणि अख्खाच्या अख्खा तोंडात टाकावा. समोर आलेला हा खास बंगाली आकाराचा मात्र मला या जन्मात तरी तसा खाणे जमणार नाही.
जेवणात मात्र एक नवीनच गोष्ट केली. तिथले लिंबू, पिळण्याऐवजी खाल्ले! त्यात काय एवढे? तर लिंबू चांगले मोठे, जाड सालीचे. लंबगोलाकार. उभी फोड, अंगठा आणि तर्जनीत धरून पिळायला अवघड इतकी मोठी आणि जरा कडकच. तीन इंच तरी लांब. पण पिळण्याऐवजी सालीसकट थोडीथोडी फोड खायची! साल चांगली खोबऱ्यासारखी चवदार आणि अजिबात आंबट नाही.
लिंबू भातावर पिळण्याऐवजी फोड थोडीथोडी खात लिंबाचा आस्वाद घेतला. बंगालीत त्याला ‘शतकोरा’ किंवा ‘लेबू’ म्हणतात. आम्ही लहानपणी झेंडूच्या फुलातले खोबरे खायचो किंवा कमळाच्या देठातून त्याच्या हिरव्या कच्च्या बिया सोलून कधीकधी खाल्ल्या त्याची आठवण झाली.
२८ जानेवारी २०१९ ला, रात्री बरोब्बर नऊ वाजता एमव्ही अॅडव्हेन्चर-९ निघाली. लॉन्चची घरघर मी प्रथमच अनुभवत होतो. त्यात केबिन आणि एकूणच व्यवस्था अपेक्षा केली त्यापेक्षा खूपच छान मिळाली. रात्री छान गरम दाल-भात-भाजीचे जेवण मिळाले हा अत्यानंद होता. गरम ‘चॉ, कोफी’ मिळाले हा आणिक दुसरा आनंद होता. तर जेवल्यावर फळे हा अनपेक्षित बोनस ! (क्रमश:)
-सी.ए. अनिलकुमार शाह, जळगाव