किन्ही येथील ग्रामसभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 09:22 PM2019-12-07T21:22:46+5:302019-12-07T21:25:02+5:30
पोलीस बंदोबस्त असताना तहकूब करावी लागली सभा
भुसावळ : तालुक्यातील किन्ही येथे ‘आपला गाव,आपला विकास’ अंतर्गत कृती आराखड्यासाठी आयोजित ग्रामसभेत १४ व्या वित्त आयोगाची सरपंच, उपसरपंचासह ग्रामसेवकांनी परस्पर विल्हेवाट लावली असा आरोप करून नागरिकांनी घरकुल, शौचालय , साफसफाई , गटारीवरील ढापे आदी विषयांवर ग्रामसभा चांगलीच गाजविली. सभेत गोंधळ झाल्यामुळे पोलिस बंदोबस्तात मागवण्यात आला. मात्र तरीही ही ग्रामसभा तहकूब करावी लागली.
७ रोजी सकाळी ११ वाजता ही ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या आवारात घेतली होती. अध्यक्षस्थानी सरपंच हर्षा येवले या होत्या. प्रभारी ग्रामसेवक आनंद सुरवाडे, उपसरपंच प्रदीप कोळी, ग्रा.पं. सदस्य नलिनी पाटील, आशा तायडे, पुष्पा बाविस्कर, सुरेखा चौधरी, सुनंदा बोंडे, छाया सुरवाडे, किरण घुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उन्हाळ्यातील पाणी टंचाईसाठी मधुकर दामू चौधरी यांची विहीर अधिग्रहित केली होती. त्याबाबातचे मानधन अद्यापही मिळालेले नाही, अशीही तक्रार केली.
भिल्ल समाजाचे लोक अद्यापही घरकुलापासून वंचित
बाहेर गावावरुन येथे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळाला. मात्र गावातीलच भिल्ल समाज अनेक वर्षांपासून घरकुलांपासून वंचित आहे. ग्रामस्थांकडून माहिती अधिकारात विचारण्यात आलेली महिती देता येत नसल्यामुळे ग्रामसेवक विजय काकरवाल हे दीड महिन्यापासून सुटीवर आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नारजी आहे. प्रभारी ग्रामसेवक आनंद सुरवाडे यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांचे आरोप
गावातील विकास कामे ठप्प झाले, शौचालयाचे अनुदान बोगस लाभार्थ्यांना मिळाले असून यासाठी ३ हजार रुपये घेण्यात आले, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना १४ महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे सफाई व पाणी पुरवठा कर्मचारी दोन महिन्यांपासून कामावर नाही. पगाराचे आश्वासन देवूनही ते अद्याप झाले नाही अशा विविध विषयांवरुन गोंधळ घातल्यामुळे. अध्यक्षांनी सभा तहकुब केली. यामुळे प्रोसिडिंग बुकात फक्त १५ ग्रामस्थांच्या स्वाक्षºय झाल्या. गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रा.पं.ने पोलिस बंदोबस्तात सभा आयोजित केली होती. तालुका पो.स्टे.चे पो.नि. रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार यांच्यासह पोलिस व होमगार्ड यांनी सभेत कडक बंदोबस्त ठेवला.