नगरविकास मंत्र्यांनी केली जळगावकरांची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:51+5:302021-07-12T04:11:51+5:30
वार्तापत्र- सुशील देवकर जळगाव मनपातील भाजपाची बहुमताची सत्ता त्यांचे ३० नगरसेवक फोडत उलथवून टाकत सेनेचा महापौर, उपमहापौर करण्यात सेनेला ...
वार्तापत्र- सुशील देवकर
जळगाव मनपातील भाजपाची बहुमताची सत्ता त्यांचे ३० नगरसेवक फोडत उलथवून टाकत सेनेचा महापौर, उपमहापौर करण्यात सेनेला यश मिळाले. या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले असता, त्यांनी महापालिकेत नियोजित वेळेपेक्षा तब्बल ६ ते ७ तास उशिराने भेट देत अडचणी जाणून घेण्याची औपचारिकता पार पाडली. मात्र, कुठलीही घोषणा न करता मुंबईत या, बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे सांगत मुंबईला रवाना झाले. त्यामुळे जळगावकारांची निराशा झाली आहे.
जळगाव शहरात आतापर्यंत मनपात ज्या पक्षाची सत्ता असेल, नेमके त्याच्या विरोधी पक्षाची सत्ता राज्यात असते, असे चित्र आहे. त्यामुळे मनपाचे प्रश्न मार्गी लावण्यात अडचणी येत होत्या. मात्र, प्रथमच राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला जळगावकरांनी मनपात बहुमताने सत्ता दिली. त्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला होता. वर्षभरात जळगावचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता येताच त्याचा भाजपला विसर पडला. नगरसेवकांच्या वॉर्डात कामे होत नसल्याने नाराजी निर्माण झाली. त्याचा लाभ उठवित भाजपातील नाराज नगरसेवकांना गळाला लावत सेनेने मनपातील सत्ता मिळविली. या घडामोडीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रथमच ते जळगावात तसेच मनपात येत असल्याने जळगाव शहरासाठी काही दिलासादायक ठोस घोषणा करतील, अशी अपेक्षा मनपातील सत्ताधाऱ्यांसह नगरसेवक तसेच नागरिकांनाही होती. मात्र, ती फोल ठरली. नगरविकास मंत्री शिंदे हे मनपापासून जवळच असलेल्या माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी आले. मात्र, सेनेतील गटबाजीमुळे म्हणा किंवा गाळेधारकांच्या आंदोलनामुळे म्हणा, महापालिकेजवळ येऊनही नियोजित बैठकीला न जाता ते पाचोऱ्याला रवाना झाले. मात्र, नंतर सायंकाळी उशिरा जळगावात दाखल झाल्यावर मनपात भेट दिली. त्यातही मनपाच्या संदर्भातील हुडको कर्जाचा विषय असो की, आकृतीबंध अथवा १०० कोटींच्या निधीचा विषय, ठोस घोषणा तर सोडाच साधे आश्वासनही कोणत्याच विषयावर दिले नाही. प्रत्येक विषयावर मुंबईला या, बैठक घेऊन विषय मार्गी लावू, असेच उत्तर मिळाले. नगरविकास मंत्री प्रथमच मनपात येत असल्याने हुडको कर्जाचा शासनाने भरलेला हिस्सा मनपाला माफ करण्याची घोषणा करतील, अथवा १०० कोटींच्या निधीबाबत काही घोषणा करतील, अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांसह जळगावकरांनाही होती. मात्र, ती फोल ठरली. सेनेतील गटबाजीवरही ते काही आढावा घेऊन सूचना करतील, असा अंदाज लावला जात होता. मात्र, त्यांनी या विषयापासून स्वत:ला दूर राखणेच पसंत केले. त्यामुळे भाजपातून सेनेत आलेल्या बंडखोरांकडून आता त्यांचे म्हणणे व तक्रारी मांडण्यासाठी थेट मातोश्रीचा दरवाजा ठोठावला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीतच नगरविकास मंत्र्यांच्या दौऱ्याने जळगावकरांचीही निराशा केली आहे.