यावल तालुक्यातील साकळी येथे आजपासून उर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 03:23 PM2019-01-01T15:23:59+5:302019-01-01T15:25:18+5:30
यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास २ पासून सुरुवात होत आहे.
यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास २ पासून सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षांची परंपरा आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे बाबांच्या संदलनिमित्त वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. संदलनिमित्त जिल्ह्यासोबतच महाराष्ट्राबाहेरुन हजारो भक्त बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येतात.
साकळी येथील हा उर्स म्हणजे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे. प्राचीन काळी डांभुर्णी, ता.यावल येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाईस हजरत सजनशाह वली (रहे.) बाबांनी बहिण मानून राखी बांधून घेतली व राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हापासून वंश परंपरेने या महिलेच्या परिवारातून आजही एकादशीला संदलनिमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मझ़ारवर चादर चढविली जाते.
ऐतिहासिक दर्गा - हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्याजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये गणना होते. बाबा शेकडो वर्षांपूर्वी साकळी येथे आले. त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे.
आम लंगरचा कार्यक्रम- संदलनिमित्त २ रोजी कय्युमशाह बाबा व त्यांचे सहकारी व गावकºयांंच्या मदतीने दर्गा परिसरात लंगरे आम (महाप्रसाद) ठेवला आहे. हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे रात्री दर्गासमोर महफिले समाँ या कार्यक्रमात कव्वाल हाजी अ. लतीफ हैराँ हे ईश्वरभक्ती व नआत म्हणून भाविकांना मंत्र-मुग्ध करणार आहे.
या दर्गापरिसरात उर्सनिमित्त पाच बाजार भरविले जातात. या उर्स दरम्यान सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण असते.