देशासह अमेरिकेतीलही आवक घटली.... हिरव्या वेलदोड्याच्या भावात ३००० रुपये प्रती किलोने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:52 AM2020-02-06T11:52:39+5:302020-02-06T11:53:17+5:30
४८००रुपये प्रती किलोवर भाव
जळगाव : मसाल्यातील प्रमुख घटक असलेल्या हिरव्या वेलदोड्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये तीन हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन ते चार हजार ८०० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. देशातील उत्पादन घटण्यासह अमेरिकेतून येणाऱ्या वेलदोड्याचेही प्रमाण कमी झाल्याने ही भाव वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या भाववाढीने मागणी तब्बल ७० टक्क्याने घटली आहे.
जळगावात मसाल्याची मोठी बाजारपेठ आहे. वेलदोड्याचे भाव पाहता त्यात सर्वाधिक वाढ झाली असून एका महिन्यात एक हजार रुपये प्रती किलो तर एका वर्षात तीन हजार रुपये प्रती किलोने वेलदोड्याचे भाव वाढले आहे.
ऐन हंगामात वेलदोड्याला फटका
दरवर्षी जुलैच्या अखेर व आॅगस्टच्या सुरुवातीला नवीन वेलदोडे येण्यास सुरुवात होते व नोव्हेंबर अखेरपर्यंत नवीन तयार माल बाजारपेठेत येतो. यंदा मात्र नेमके त्याच वेळी अति पावसाचा फटका बसल्याने वेलदोड्याच्या बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम झाला. काही व्यापाºयांनी गोदामात ठेवलेला मालही ओला झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात वेलदोड्याची आवक कमी-कमी होत गेली व भाव वाढतच गेले.
अमेरिकेतील आवकही घटली
देशातील वेलदोड्याची आवक घटली असताना अमेरिकेतून येणाºया मालाचेही प्रमाण कमी झाले. यंदा अमेरिकेतही वेलदोड्याचे उत्पादन कमी आल्याने तसेच अमेरिका व इराण यांच्यातील तणावामुळेही आवकवर परिणाम होत गेला. त्यामुळे यंदा देशी-विदेशी मालाची कमतरता भासत असल्याने भाव वाढीस मदत होत आहे.
सातत्याने भाव वाढ
दीड वर्षापूर्वी जुलै २०१८मध्ये वेलदोड्याचे भाव ९०० रुपये प्रती किलो होते. त्या वेळी केरळमधील पूरस्थितीमुळे भाव वाढून ते १२०० रुपये प्रती किलो झाले. त्यानंतर हे भाव वाढत जाऊन फेब्रुवारी २०१९ मध्ये ते एक हजार ८०० रुपये प्रती किलो झाले व वर्ष अखेर डिसेंबर २०१९च्या शेवटी ३ हजार ८०० रुपये प्रती किलोवर पोहचले. आता तर ते ४ हजार ८०० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहता वर्षभरापूर्वी फेब्रुवारी २०१९मध्ये असलेल्या भावात ३ हजार रुपये प्रती किलोने तर महिनाभराच्या तुलनेत एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
खान्देशातील मसाल्यावरही परिणाम
मसालेदार भाज्या हा खान्देशातील खास मेनू असून त्यासाठी विविध मसाल्याचे घटक पदार्थ असलेला खास मसालाही बाजारात उपलब्ध असतो. त्यास खान्देशसह इतरही मोठी मागणी असते. मात्र सध्या वेलदोड्याच्या आवकवर परिणाम झाल्याने खान्देशातील हा मसालाही वधारला आहे. २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, एक किलो अशा वेगवेगळ््या वजनात उपलब्ध असलेल्या या मसाल्याच्या पाकिटांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी वधारले आहेत.
मागणी घटली
मोठ्या प्रमाणात आवक घटल्याने वेलदोड्याची मागणीही ७० टक्क्यांनी कमी झाली आहे. पूर्वी ज्या व्यापाºयाकडे १० गोणी वेलदोडे विक्री होत असे त्यात घट होऊ आता केवळ ३ गोण्या वेलदोड्याची विक्री होत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. ५० किलो वेलदोड्याची गोणी आता सव्वा दोन ते अडीच लाखाला येत असल्याने व्यापाºयांनीही खरेदी कमी केली आहे.
यंदा देशातील वेलदोड्याचे उत्पादन कमी होण्यासह अमेरिकेतून होणारी आयातही घटली आहे. त्यामुळे वेलदोड्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या एक हजार ८०० रुपये प्रती किलो असलेल्या वेलदोड्याचे भाव सध्या चार हजार ८०० रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.
- सुरेश बरडिया, मसाला व्यापारी, जळगाव.