बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे शनि अमावस्येनिमित्त उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 06:39 PM2019-01-05T18:39:57+5:302019-01-05T18:41:34+5:30
सुप्रसिद्ध शिरसाळा मारोती देवस्थान येथे शनिवारी शनि अमावस्येनिमित्त मोठ्या प्रमाणावर भक्ताचा जनसागर उसळला होता.
जामठी, ता.बोदवड : तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेले शिरसाळा मारोती देवस्थान येथे शनिवारी शनि अमावस्येनिमित्त मोठ्या प्रमाणावर भक्ताचा जनसागर उसळला होता.
दरम्यान या ठिकाणी जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धुळे आदी ठिकाणावरून मोठ्या संख्येने भक्तांची सकाळपासूनच दर्शनासाठी रिघ लागलेली होती.
तसेच नवसाला पावणारा मारोती म्हणून शिरसाळा मारोती देवस्थानची ओळख आहे. याठिकाणी नवस फेडण्यासाठी दूरवरून भक्त येत असतात. आज दर्शवेळा शनि अमावस्या असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त नवस फेडताना दिसत होते. नवस फेडल्यामुळे मनातल्या इच्छा पूर्ण होऊन घरात सुख शांती नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
याठिकाणी शिरसाळा मारोती देवस्थानच्यावतीने वाहतुकीचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. बोदवड पोलीसांच्या वतीने अपघात होऊ नये, वाहतूक विस्कळीत होऊ नये व भक्तांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले. यासाठी बोदवडचे पोलीस निरीक्षक हे स्वत: हजर होते. या मंदिर देवस्थानची डीवाय.एस.पी सुभाष नेवे यांनी पाहणी केली.