उसनवारीच्या पैशाने मित्रानेच केला मित्राचाच घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:10+5:302021-08-28T04:22:10+5:30
अमळनेर : उसनवार दिलेले पैसे परत मिळत नसल्याने त्यातून दोन मित्रांमध्ये वाद झाले आणि वादाचे रूपांतर एकाच्या खुनात झाले. ...
अमळनेर : उसनवार दिलेले पैसे परत मिळत नसल्याने त्यातून दोन मित्रांमध्ये वाद झाले आणि वादाचे रूपांतर एकाच्या खुनात झाले. अमळनेरच्या खुनाच्या घटनेतील आरोपी हा खासगी भिसी चालवित होता. याच सावकारीमुळे तो अवघ्या पाच तासात पोलिसांच्या हाती लागला आणि खुनाचा उलगडा झाला.
अमळनेरात शुक्रवारची सकाळी उगवली ती खुनाच्या घटनेने. प्रकाश दत्तू चौधरी याने कैलास पांडुरंग शिंगाणे याला टीव्ही केबल घेण्यासाठी एक लाख रुपये दिले होते. कैलास ते परत देत नव्हता म्हणून गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. प्रकाश हा कैलासची टीव्ही केबल वारंवार कापत होता. यातून वादाचे रूपांतर द्वेषात पसरले.
आणि केबल कापण्याच्या धारदार कटरनेच कैलासने त्याच्याच दुकानाच्या बाहेर प्रकाशचा गळा कापून खून केला. विश्वासात घेऊन आरोपी पकडला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सकाळीच कैलासचे घर गाठले आणि त्याच्या पत्नीला विश्वासात घेऊन माहिती मिळविली. कैलास तिथून फरार झाला होता. कैलासने धुण्यासाठी टाकलेले कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले.
तो चोपडा येथे त्याच्या शालकाकडे गेल्याचे समजताच दोन पोलीस चोपड्याकडे रवाना झाले. पोलिसांनी त्याच्या शालकालादेखील विश्वासात घेतले. शालक हा आरोपी कैलास याला घेऊन वेले गावाजवळ शेतात थांबले होता. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले व मोटारसायकलने त्याला अमळनेरला आणले.
प्रकाश हा आपल्याकडील केबल वारंवार कापत होता त्यामुळे नुकसान होत होते. प्रकाशला याबाबत कोणाकडून तरी पैसे मिळत होते असे समजते. कैलास त्याला २६ रोजी सोबत घेऊन भोईराज आईस्क्रीम पार्लर या नपा संकुलातील पहिल्या मजल्यावर दुकानात घेऊन गेला. तिथे दोघे दारू सेवन केली. यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास केबल कापण्याच्या कटरने त्याचा गळा कापून खून केला व कटर तापी नदीत फेकून दिल्याची कबुली दिली.