आधार केंद्रावर नगरसेविकेच्या बनावट शिक्क्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:18+5:302021-07-07T04:19:18+5:30
जळगाव : रेल्वे स्टेशन परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील आधार केंद्रावर आधारकार्ड दुरुस्तीसाठी तांबापुरातील नगरसेविका शबानाबी सादीक खाटीक ...
जळगाव : रेल्वे स्टेशन परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील आधार केंद्रावर आधारकार्ड दुरुस्तीसाठी तांबापुरातील नगरसेविका शबानाबी सादीक खाटीक यांच्या नावाच्या बनावट शिक्क्याचा वापर होत असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी इरफान जहिर शेख (रा.मलीक नगर), अमर भालचंद्र येवले (रा.खोटे नगर) व पियूष विनोद नवाल (रा.कुसुंबा, ता.जळगाव) या तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील आधार केंद्रावर आधारकार्ड दुरुस्तीसाठी नगरसेविका शबानाबी सादीक खाटीक यांच्या नावाच्या शिक्क्याचा वापर होत असल्याचे नईम बशीर खाटीक (रा.तांबापुरा) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार ३ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात असताना नगरसेविका पुत्र सलमान सादीक खाटीक यांच्या कानावर घातला. त्यावर सलमान यांनी घरी आईला शिक्क्याबाबत विचारणा केली असता आपण कोणालाच शिक्का दिलेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे सलमान यांनी सोमवारी दुपारी नगरसेवक प्रशांत नाईक यांना सोबत घेऊन आधारकेंद्र गाठले असता तेथे अमर येवले व त्याचा ऑपरेटर नागरिकांच्या आधारकार्ड दुरुस्तीसाठी शिक्क्याचा वापर करताना रंगेहाथ आढळून आले. त्यावेळी लागलीच शहर पोलिसांना बोलावण्यात आले. अधिकच्या चौकशीत हा शिक्का कुसुंबा येथील पियूष नवाल याच्याकडून आणल्याचे इरफानने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही सायंकाळी आणले. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.