औषधांच्या नावावर सर्पविषाचा ड्रग्ससाठी वापर
By admin | Published: February 26, 2017 12:41 AM2017-02-26T00:41:40+5:302017-02-26T00:41:40+5:30
सर्पमित्र संमेलनात डॉ.वरद गिरी यांची धक्कादायक माहिती: सर्पतस्करीमध्ये सर्पमित्रांचा समावेश अधिक
जळगाव : सर्पविषाचा वापर हा अनेकदा सर्पदंशाच्या औषधीसाठी केला जातो. यासाठी सर्पमित्रांचा वापर करून सर्पविष काढले जाते. मात्र औषधांच्या नावावर देशातील काही बड्या फार्मा कंपन्याकडून सर्पविषाचा काळा बाजार सुरु आहे. ड्रग्स सारख्या मादक द्रव्यांसाठीही सर्पविषाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती सर्प संशोधक डॉ.वरद गिरी (बैंगलोर) यांनी दिली.
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात २५ फेब्रुवारी रोजी आयोजित पहिला राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, भारतात नागमणी सारख्या अंधश्रद्धेमुळे व सर्पविषापासून तयार होणाºया मादक द्रव्यामुळे सर्पांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. भारतातील बड्या कंपन्याकडे सर्पविष साठविले जात असून, त्याचा वापर औषधांसाठी होत नाही.
सर्पविषाच्या काळ्याबाजारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल भारतात सुरु आहे. कंपन्याकडे अॅट्राबेस , बॅट्रोपेज अशा प्रकारची औषधे कंपन्याकडून रुग्णालयांमध्ये पुरविली जात नाही, असाही आरोप डॉ.गिरी यांनी केला.
समारोपप्रसंगी पॉवर पॉँईट सादरीकरणाने सर्पाविषयी माहिंती दिली जाणार आहे. तसेच काही ठराव देखील या संमेलनात होणार आहे.
सर्पमित्र म्हणजे एक शिवी
सर्पमित्रांकडे आज समाजात वेगळ्या पध्दतीने पाहिले जात आहे. सर्पतस्करीच्या ज्या घटना समोर होत आहेत. यामध्ये सर्पमित्रांचा समावेश अधिक असून, सर्पमित्र म्हणजे एक शिवी असल्याचे मत डॉ.वरद गिरी यांनी व्यक्त केले. सर्पमित्रांविषयी समाजात निर्माण होणारी भावना याकडे सर्पमित्रांनी गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील सर्पमित्रांचा विमा
जिल्ह्यातील सर्पमित्रांचा २ ते ५ लाख रुपयांचा विमा काढण्याची घोषणा आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केली. तसेच राज्यातील सर्पमित्रांचे सर्पदंशामुळे होणारे मृत्यू व यासाठी देखील शासनाकडून मदत करण्यात यावी यासाठी विधानसभेत हा मुद्दा मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.