तुरटीचा उपयोग... म्हणायला एकदम तुरट, पण आहे औषधी गुणांनी युक्त
By अमित महाबळ | Published: September 1, 2022 10:42 PM2022-09-01T22:42:51+5:302022-09-01T22:43:34+5:30
आयुर्वेदातील रसशास्त्रामध्ये उपरस वर्गात, तुरटीचे औषधी गुणधर्म व उपयोगांचे वर्णन केले आहे.
जळगाव : तुरटी ही सौराष्ट्रात (गुजरात) मिळणारी शुभ्र वर्णाची, तुरट चवीची आणि स्फटिक रुपातील एक प्रकारची मृत्तिका (माती) आहे. कांक्षी, स्फटिका, फिटकरी, शुभ्रा या नावांनी देखील ती ओळखली जाते. आयुर्वेदातील रसशास्त्रामध्ये उपरस वर्गात, तुरटीचे औषधी गुणधर्म व उपयोगांचे वर्णन केले आहे.
अम्ल, कषाय, क्षारीय रस, स्निग्ध, लघु, व्रणशोधक, जंतुघ्न, कृमिनाशक, केश्य, नेत्र्य (नेत्रासाठी हितकर), रक्तस्तंभक, बुरशीनाशक, दंतशुलनाशक, मुख दुर्गंधीनाशक, रोमछिद्र संकोचक, त्वचा विकारनाशक, कंडूनाशक, मुत्रदाह शामक हे तुरटीचे गुणधर्म आहेत.
असा होतो तुरटीचा उपयोग
जखम : तुरटीच्या पाच टक्के (१०० मिली पाणी पाच ग्रॅम तुरटी चूर्ण) जलीय द्रावणाचा उपयोग घशाच्या संसर्गामध्ये गुळण्या करण्यासाठी, जखमा धुण्यासाठी, नाकातील रक्तस्त्राव थांबविण्यासाठी, योनी संसर्गामध्ये योनी धावनासाठी, तसेच मुत्रमार्ग संसर्गामध्ये होतो.
जलशुद्धीकरण : अशुद्ध, गढूळ पाण्यात तुरटीचा खडा थोडा वेळ ठेवला असता पाणी शुद्ध होते. कपड्यांना रंग देण्यासाठी तुरटीचा वापर करतात म्हणून तिला रंगदा, दृढरंगदा, रंगदात्री म्हणतात.
केश्य : १ चमचा तुरटीचे चूर्ण १०० मिली पाणी व १० मिली कंडिशनर हे मिश्रण केसांना लावून थोडा वेळ मसाज करून केस धुवून टाकावे. यामुळे केसांची मुळे घट्ट होतात. तुरटीचा लेप केसांच्या मुळाशी लावल्यास त्वचा संसर्ग, कोंडा, खाज, उवा, लिखा, बुरशीजन्य आजार इ. मध्ये उपयोग होतो.
जंतुघ्न/कृमिनाशक : टॉन्सिलिटीस, सर्दी , खोकला, घशाच्या संसर्गाध्ये १ चमचा तुरटी चूर्ण १०० मिली गरम पाणी १ चमचा सैंधव मीठ घालून गुळण्या केल्यास लवकर त्रास कमी होतो. तोंडाची दुर्गंधी येत असल्यास माऊथ वॉश म्हणूनही याचा वापर करता येतो.
दातांच्या समस्या : किड लागणे, हिरड्यांमधून रक्त येते, तोंडाची दुर्गंधी, दाढ दुखणे इ. लक्षणांमध्ये दंत मंजनासोबत तुरटी चूर्ण दातांवर घासल्यास दात मजबूत होतात.
तोंड येणे : जिभेवरील फोडांवर तुरटी चूर्णाचा मधासोबत लेप लावल्यास त्वरीत आराम मिळतो.
व्रणशोधक : तुरटीच्या पाण्याने जखमा धुवून काढल्यास, जखम लवकर भरून निघते.
रक्तस्तंभक : तुरटी कषाय रसामुळे रक्तवाहिन्यांची मुखे संकुचित करून रक्तस्त्राव बंद करते. शरीरावर कापल्यास होणाऱ्या रक्तस्त्रावामध्ये तुरटीचे चूर्ण हळदीसोबत लावावे.
त्वच्य : त्वचाविकार, मुरुम, चेहऱ्यावरील काळे डाग व सुरकुत्या, रोमछिद्र खुले राहाणे इ. मध्ये तुरटी चूर्ण, गुलाब जल व मधासोबत लेप लावल्यास सर्व लक्षणे कमी होवून त्वचा निरोगी व तजेलदार दिसते.
नेत्र्य : डोळे येणे, लाल होणे, डोळ्यांना खाज येणे इत्यादी लक्षणांमध्ये तुरटीच्या पाण्याचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो.
शरीराची दुर्गंधी घालवते : आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून आंघोळ केल्यास घामाची दुर्गंधी दूर होते. तसेच तळपायाला भेगा पडल्यास तुरटीच्या पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास भेगा भरून निघतात. चिमुटभर तुरटी चूर्ण पाण्यासोबत विरघळून ते पाणी पिल्यास लघवीला आग होणे, जळजळ होणे, मुत्रमार्गाचा संसर्ग आदी आजारात फायदा होतो.
तुरटी औषधी गुणांनी युक्त असून, तिचे विविध उपयोग आहेत. ती पोटातून घ्यायची असल्यास आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यानंतरच वापर करावा, अशी माहिती जळगावच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील रसशास्त्र व भैषज्यकल्पना विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक उज्ज्वला जाधव यांनी दिली.