व्ही. स्कूलच्या इंग्रजी विषय समिती प्रमुखपदी भरत शिरसाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:17+5:302021-07-11T04:13:17+5:30
एरंडोल : व्ही. स्कूलच्या इंग्रजी विषय समिती प्रमुखपदी भरत शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळातील ...
एरंडोल : व्ही. स्कूलच्या इंग्रजी विषय समिती प्रमुखपदी भरत शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळातील विद्यार्थ्यांचा शिकण्याचा तोटा लक्षात घेऊन तसेच येणाऱ्या काळातील ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात ‘वोपा’ या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या संस्थेमार्फत व्ही- स्कूल कन्टेन्ट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू केला आहे. याद्वारे ‘व्ही स्कूल फ्री ॲप’साठी इयत्ता पहिली ते दहावीकरिता अभ्यासक्रम विकसित करणे सुरू आहे. प्रत्येक विषयासाठी जिल्हा विषय समित्या तयार करण्यात आल्या असून, प्रत्येक विषय समितीचे प्रमुख निवडण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील इंग्रजी विषय समितीच्या प्रमुखपदी जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण येथील प्रभारी मुख्याध्यापक भरत शिरसाठ यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे, तसे आदेश त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहेत.
इंग्रजी विषय समितीमध्ये टी. बी. पांढरे (आर. आर. विद्यालय, जळगाव) व सपना रावलानी (आदर्श सिंधी हायस्कूल, जळगाव) यांची सहायक म्हणून निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इंग्रजी विषय तज्ज्ञ शिक्षक या समितीमध्ये अभ्यासक्रम विकसनाचे काम करणार आहेत.