४ लाख ५२ हजार डोसमध्ये दिली ४ लाख ७१ हजार जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:29+5:302021-05-20T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : देशभरात लस वाया जाण्याचे प्रमाण सगळीकडे असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र आरोग्य यंत्रणेने लसीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : देशभरात लस वाया जाण्याचे प्रमाण सगळीकडे असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र आरोग्य यंत्रणेने लसीचा एकही थेंब वाया जाऊ न देता त्याचे योग्य नियोजन करीत जिल्ह्यात आलेल्या डोसपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याची कामगिरी केली आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत लसीचे एकुण ४ लाख ५२ हजार ९० डोस आले असताना ४ लाख ७१ हजार १५५ नागरिकांना लस दिली आहे.
मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार ९० डोस जिल्ह्याला मिळाले होते. त्यात चार लाख ४ हजार ८० डोस हे कोविशिल्डचे तर ४८ हजार १० डोस हे कोव्हॅक्सिनचे होते. त्यात एवढ्याच संख्येच्या नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षीत होते. मात्र जिल्ह्यातील प्रशिक्षित नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या नेतृत्वात चार लाख ७१ हजार १५५ नागरिकांना लस देण्याची कामगिरी केली आहे.
कसे केले नियोजन
कोविशिल्डच्या एका व्हायलमध्ये १० डोस दिले जातात. त्यात सहा मि.लि. लस मिळते. मात्र एका व्यक्तीला फक्त ०.५ इतकी लस दिली जाते. उरलेले औषध हे वाया जाण्याच्या प्रमाणात मोजले जाते. मात्र हे वाया जाण्याच्या प्रमाण गृहित धरुन जे औषध बाटलीत जास्तीचे दिले जाते. ते देखील जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षीत नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरून जादाचे लसीकरण केले आहे.
मंगळवारपर्यंतची आकडेवारी
आलेले डोस - ४५२०९०
झालेले लसीकरण ४,७१,१५५
शिल्लक डोस ४००
कोट- एका व्हायलमध्ये ६ मिली लस असते. वाया जाण्याचे प्रमाण गृहित धरुन हे जास्तीचे औषध दिले जाते. ते देखील वाया जाऊ न देता वापरले गेल्याने जिल्ह्यात आलेल्या लसींपेक्षा लसीकरणाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे - डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक