महिनाभराने सामान्यांना सुरू होऊ शकते लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:00+5:302021-03-08T04:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील अन्य व्याधी असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील अन्य व्याधी असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत अशा ४ हजारांवर नागरिकांनी लसीचा पहिला डोज घेतला आहे. आगामी महिनाभरात हा टप्पा पूर्ण करण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट असून त्यासाठी सोमवारपासून सर्व आरोग्य केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात होत आहे. दरम्यान, साधारण महिनाभराने सामान्यांच्या लसीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुरुवारपासून खासगी लसीकरणाची केंद्रेही सुरू करण्यात आली आहे. यात शहरातील ८ केंद्रांचा समावेश आहे. यासह महापालिकेचे छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, तसेच मायादेवी नगरातील रोटरी भवनात या दोन ठिकाणी शासकीय केंद्र सुरू करण्यात आले आहेत. लसींच्या डोजचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शाहू महाराज रुग्णालयात दोन दिवसांमध्ये ५०० नागरिकांनी लस घेतली आहे. या ठिकाणी जागा थोडी छोटी असल्याने गर्दी होत असते. यासह ज्येष्ठांना त्रास नको म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील केंद्र हलवून मायादेवी नगरातील रोटरी भवनात सुरू करण्यात आले आहे.
अशी आहे स्थिती
साधारण ३.५० ते ४ लाख ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड नागरिकांचे उद्दिष्ट
झालेले लसीकरण
४५ वर्षावरील कोमॉर्बिड : १३१
६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक : ४०७१
केंद्र : २ शासकीय, ८ खासगी
कोट
महिनाभराने सामान्यांना लसीकरण सुरू होईल, असे शासनाने जाहीर केलेले नाही. मात्र, महिनाभरात ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. त्यानंतर सामान्यांना लस देता येणार आहे. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
लस घेतली तरीही काळजी घ्याच
१. लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोज घ्यायचा आहे.
२. दुसरा डोज घेतल्याच्या १४ दिवसांनी शरीरात ॲन्टिबॉडी तयार होतात.
३. तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
४. नियमित मास्क घालणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, नाका, तोंडाला हात लावण्याआधी ते स्वच्छ धुऊन किवा सॅनिटाईझ करूनच लावावे.
५. लसीचा दुसरा डोज घेतल्यावरही काळजी घेणे आवश्यक आहे.